लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करणाऱ्यांना राम पावणार नाही, संजय राऊत यांनी मोदी सरकारला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची हे ढोंग आमच्याकडे नाही. राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतील संसद यांची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे. जर दिल्लीतल्या लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात पूजा करणार असाल तर तो राम पावणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला फटकारले.

संसदेतील घुसखोरीवरून प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करून संसदेत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावरून संजय राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची हे ढोंग आमच्याकडे नाही. खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी आम्ही लढणार आहोत. या देशातील हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याविरोधात लढणार आहोत. गुडघे टेकायला आम्ही मिंधे नाही.

व्हीव्हीपॅटमधील मतांची 100 टक्के मोजणी करा

पंतप्रधान मोदी यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी युद्धाच्या स्थितीबाबत चर्चा केली; पण माझे पंतप्रधानांना आव्हान आहे की, त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत निवडणुकीची चर्चा करावी. स्त्रायलमधून आपल्या देशात ईव्हीएम हँकींगचे तंत्र आले आहे हे सगळ्यांना माहीत आहे. इस्रायल, अमेरिकेमध्ये निवडणुका आजही बॅलेट पेपरवर होतात. मोदींनी त्यांचे अनुकरण करावे. ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटमधील मतांची 100 टक्के मोजणी झाली पाहिजे, अशी मागणी केली.