अतिवृष्टीमुळे ‘परे’च्या १० लोकल आजारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अतिवृष्टी झाल्याने नालासोपारा येथे पुराचे पाणी प्रचंड मोठय़ा प्रमाणावर साचले. त्यामुळे बाधित झालेली रेल्वे तब्बल २४ तासांनंतर धिम्या गतीने सुरू झाली आहे. चर्चगेट ते विरार लोकल सेवा रुळावर आली असली तरी भाईंदर ते विरारदरम्यान लोकल दरताशी १० कि.मी.च्या वेगाने चालवाव्या लागत असल्याने प्रवासाचा वेळ वाढला आहे. दरम्यान, ४०० ते ६०० मि.मी.पर्यंत रुळांवर पाणी साचल्याने १० लोकलमध्ये पाणी शिरून त्या बिघडल्याने दुरुस्तीसाठी त्यांची रवानगी कारशेडमध्ये करण्यात आली आहे. या लोकल लवकरच पुन्हा सेवेत येण्यासाठी काही दिवस लागणार असल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना कमी फेऱ्यांचा सामना करावा लागणार आहे.

मुसळधार पावसाने नालासोपारा परिसरात पाणी साचल्याने गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस अडकल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. या प्रवाशांना मदतकार्य करण्यासाठी नौदलाला पाचारण करण्यात आले. बुधवारी पहाटे ६.४५ वाजता विरारहून डहाणूच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. विरारहून चर्चगेटच्या दिशेने स. ६.२२ वाजता पहिली लोकल सोडण्यात आली.

‘प.रे.’च्या बंद गाडय़ा ‘म.रे.’ने खेचल्या

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरारदरम्यान पावसाच्या पुराने दहा लोकल बिघडल्या. तसेच राजकोट, शताब्दी, वडोदरा एक्स्प्रेसच्या मोटरमध्येही पाणी शिरल्याने त्यांचे इंजिन बिघडले आहेत. पाणी शिरलेल्या या मोटर्सना सुकविण्यासाठी खास हिटरचा वापर करावा लागतो. त्यासाठी त्यांना कारशेडमध्ये खेचून नेण्यासाठी मध्य रेल्वेने तयार केलेल्या खास वॉटरप्रूफ डिझेल इंजिनांचा वापर करण्यात आला. या इंजिनांनी वसई येथून आठ इंच पाण्यातून सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेसला खेचून भिवंडीपर्यंत नेल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.