
सामना ऑनलाईन, विजयनगर
विजयनगर भागात राहणाऱ्या एका चित्रपट निर्मात्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हा खून त्याच्याकडे भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूनेच केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 महिलांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. रमेश कुमार जैन असं मयताचे नाव असून त्याचा प्लॅस्टीकची उत्पादनं तयार करण्याचा कारखानाही होता.
बंगळुरूतील आरपीसी ले-आऊटमध्ये रमेश जैन रहात होते. त्यांनी नाझीर नावाच्या माणसाला दिपांजलीनगर भागात असलेलं त्याचं घर भाड्याने दिलं होतं. जैन हे नाझीरच्या घरी भाडं मागण्यासाठी जातोय असं सांगून घरातून बाहेर पडले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाहर पडलेले वडील रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यानं जैन यांच्या मुलाने नाझीरला फोन केला, यावेळी नाझीरने जैन आपल्या घरी आलेच नाही अशी थाप मारली. यामुळे चिंतेत पडलेल्या जैन यांच्या मुलाने पोलिसांत वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दुबासीपाल्या भागात जैन यांचा मृतदेह गटारात आढळला होता. पोलिसांचा पहिला संशय हा भाडेकरू नाझीरवरच होता. त्यांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. चौकशीमध्ये नाझीरने जैन यांचा खून केल्याचं कबूल केलं. पुरावा नष्ट करण्यासाठी जैन यांचा मृतदेह गटारात फेकून दिल्याचंही त्याने सांगितलं. जैन यांचा खून करण्यासाठी नाझीरला त्याच्या घरच्यांनी मदत केली होती. यामुळे पोलिसांनी इस्लाम खान, अब्दुल हाशीम, सय्यद अहमद, मोहम्मद जुबेर, हिना आणि शबीना ताज या सगळ्यांना अटक केली आहे. नाझीरने अनेक महिन्यांचं भाडं थकवलं होतं. ते देण्याचे पैसे नसल्याने त्याने जैन यांना मारून टाकण्याचं ठरवलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.




























































