एकेरी गटात चॅम्पियन टेनिसपटू घडवायचाय!

218

लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा या हिंदुस्थानच्या टेनिसपटूंनी दुहेरीत देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रुबाबात फडकवला, पण एकेरीत चमकदार कामगिरी करणारे खेळाडू अद्याप या देशात निर्माण झाले नाहीत. आता पुढील दहा वर्षांसाठी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनकडून एक मिशन तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत एकेरीत ग्रॅण्ड स्लॅमसारखी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा टेनिसपटू घडवण्याचे ध्येय बाळगण्यात आले आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे अखिल हिंदुस्थानी टेनिस असोसिएशनचे सहसचिव सुंदर अय्यर यांनी. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी टेनिसशी निगडित विविध विषयांवर दृष्टिक्षेप टाकला.

दहा वर्षांतील टार्गेट पूर्ण केले

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनकडून 2011 ते 2020 या दहा वर्षांसाठी एक मिशन डोळ्यांसमोर ठेवण्यात आले होते. तसा रोड मॅपही केला होता. त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. महाराष्ट्राची प्रार्थना ठोंबरे हिने ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. तसेच पुरव राजा, ऋतुजा भोसले व अर्जुन कढे यांनी डेव्हिस कपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. 12 वर्षीय मानस धामणे याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील 12 वर्षांखालील ‘एड्डी हर’ ही जागतिक स्पर्धा जिंकून इतिहास रचला. ‘ज्युनियर स्तरावरील ग्रॅण्ड स्लॅम म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा जिंकणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच टेनिसपटू ठरला’ अशा शब्दांत सुंदर अय्यर यांनी कौतुक केले.

‘सुपर 30’ योजना राबवणार

अखिल हिंदुस्थानी टेनिस असोसिएशनकडून आगामी काळामध्ये ‘सुपर 30’ योजना राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक कानाकोपऱयामधून सर्वोत्तम 30 खेळाडूंची निवड करून त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, जेणेकरून त्यामुळे देशामधून चॅम्पियन खेळाडू घडतील असे सुंदर अय्यर म्हणाले

इतर महत्त्वाच्या बाबींवरही लक्ष

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन अव्वल दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी पुढाकार घेत आहे याचसोबत इतर महत्त्वाच्या बाबींवरही लक्ष देत आहे. महाराष्ट्र सरकारच्या साथीने नागपूर येथील आदिवासी विभागातील 80 व्यक्तींना ट्रेनिंग देऊन टेनिस प्रशिक्षक बनवण्यात आले. आता ही सर्व मंडळी देशातील विविध ठिकाणी टेनिसशी संबंधित काम करून चांगले मानधन मिळवत आहेत. तसेच आपल्या येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी ज्युनियर खेळाडूंना थायलंड आणि सीनियर खेळाडूंना युरोप दौऱयावर काही दिवसांसाठी पाठवण्यात येते. टेनिस रॅकेट तुटल्यानंतर ते दुरुस्त करणारे वर्कर, कोचेस, सपोर्ट स्टाफ या सर्वांसाठीही पुढाकार घेतला जातो, असेही सुंदर अय्यर स्पष्टपणे सांगतात.

स्पॉन्सर्स मिळायला हवेत

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हिंदुस्थानात टेनिस या खेळाच्या स्पर्धा कमी प्रमाणात आयोजित करण्यात येतात का? असा सवाल सुंदर अय्यर यांना विचारला असता ते म्हणाले, स्पर्धांचे आयोजन करायला हरकत नाही, पण तेवढा पैसा आणायचा कुठून? टाटा ओपन ही मोठी स्पर्धा आपल्याकडे खेळवण्यात येते. या स्पर्धेसाठी 12 कोटींचा खर्च लागतो. याशिवाय एटीपी चॅलेंजर या तीन व एक महिलांची स्पर्धाही खेळवली जाते. पुरुषांच्या एटीपी स्पर्धांना प्रत्येकी एक कोटी व तीस लाख तसेच महिलांच्या स्पर्धेला 35 लाख खर्च होतो. स्पॉन्सर्सशिपसाठी कॉर्पोरेट सेक्टर किंवा इतर ठिकाणांहून मदतीचा हात मिळाल्यास सर्व काही शक्य होईल असे सुंदर अय्यर यांना वाटते.

…म्हणून क्ले कोर्टला नापसंती

महाराष्ट्रातील विविध जिह्यांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक, पंच, लाइनमन यांच्या यादीवर नजर टाकल्यास हिंदुस्थानात महाराष्ट्राचाच बोलबाला दिसून येतो, पण महाराष्ट्रात क्ले व ग्रास कोर्ट कमी प्रमाणात आहेत. हार्ड कोर्ट जास्त प्रमाणात आहेत. क्ले कोर्टसाठी जास्त पाणी लागते तसेच क्ले कोर्टच्या देखभालीसाठीही खर्च लागतो. मात्र फ्रेंच ओपन किंवा डेव्हिस कपमधील एखादी लढत क्ले कोर्टवर असल्यास खेळाडूंना नवी दिल्ली, चंदिगढ, केरळ, तामीळनाडू येथील क्ले कोर्टवर सरावाला पाठवण्यात येते. हिंदुस्थानी संघाच्या कॅम्पचेही तिथे आयोजन करण्यात येते असे सुंदर अय्यर पुढे नमूद करतात.

आपली प्रतिक्रिया द्या