
>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]
धाराशीव जिह्यातील तेर हे असेच एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ. तेरचे महत्त्व केवळ स्थानिक इतिहासापुरते मर्यादित नसून प्राचीन दख्खनच्या व्यापारी इतिहासात त्याला महत्त्वाचे स्थान होते.
महाराष्ट्राच्या पुरातत्त्वीय इतिहासात काही स्थळे अशी आहेत की, ज्यांचा उल्लेख केवळ एखाद्या प्राचीन वस्तीच्या संदर्भात करता येत नाही; त्यांचा इतिहास संपूर्ण प्रदेशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाशी जोडलेला आहे. धाराशीव जिह्यातील तेर हे असेच एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ आहे. तेरणा नदीच्या काठावर वसलेले आजचे तेर प्राचीन काळात ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. प्राचीन भारतीय तसेच परकीय साहित्यिक स्रोतांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. विशेषत इ.स.च्या पहिल्या शतकाच्या आसपास लिहिल्या गेलेल्या ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या ग्रंथात तगरचा उल्लेख दख्खनमधील एका महत्त्वाच्या व्यापारी केंद्राच्या रूपात करण्यात आला आहे. या ग्रंथात प्रतिष्ठान आणि तगर या दोन बाजारपेठांना विशेष महत्त्व दिले आहे. दुसऱया शतकातील टॉलेमीच्या भूगोलमध्येही तगरचा उल्लेख आढळतो. त्यामुळे तेरचे महत्त्व केवळ स्थानिक इतिहासापुरते मर्यादित नसून प्राचीन दख्खनच्या व्यापारी इतिहासात त्याला महत्त्वाचे स्थान होते, हे प्राचीन साहित्यावरून स्पष्ट होते.
तेरशी संबंधित स्थानिक परंपराही प्राचीन आहे. इ. स. 1757 मध्ये रचलेल्या ‘तेरमाहात्म्य’ या स्थानिक ग्रंथात तेरला विविध युगांमध्ये वेगवेगळी नावे असल्याचे नमूद केले आहे. प्राचीन तेरमध्ये पिपिलिका नदी, कलकुंड, नागवापी आणि कुकुळीकुंड यांसारख्या स्थळांचा उल्लेख आढळतो. तेरमधील उत्तरेश्वरलिंग आणि बिल्वेश्वरलिंग यांचाही उल्लेख या परंपरेत आहे. संशोधक फ्लिट यांच्या मते ‘पिपिलिका’ हे तेरणा नदीचे प्राचीन नाव असावे. तेरचा संबंध मराठी संत गोरा कुंभार यांच्याशीही जोडला जातो. अशा प्रकारे तेरचा इतिहास पुरातत्त्वीय अवशेषांबरोबरच स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक स्मृतींमध्येही जिवंत राहिला आहे.
तेरच्या पुरातत्त्वीय अभ्यासाला शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हेन्री कझिन्स यांनी तेरची पाहणी केली. इ. स. 1929-30 मध्ये निजामाच्या पुरातत्त्व विभागाने येथे पाहणी केली. स्वातंत्र्यानंतर इ. स. 1958 मध्ये चापेकर आणि बॅनर्जी यांनी तेरमध्ये उत्खनन केले. त्यानंतर एस. बी. देव आणि पथी यांनी इ.स. 1975 मध्ये येथे उत्खनन केले. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागानेही इ. स. 1967-68, 1968-69, 1987 आणि 1988 मध्ये तेरमध्ये उत्खनन केले. मात्र यापूर्वीच्या उत्खननांचे सविस्तर अहवाल उपलब्ध नसल्यामुळे प्राचीन तेरच्या समाज जीवनाचे सर्वंकष चित्र स्पष्टपणे समोर आले नव्हते. पूर्वीची उत्खनने तुलनेने लहान प्रमाणात झाली आणि त्यांचा भर प्रामुख्याने पुरावशेषांवर होता. त्यामुळे 2014-15 मध्ये करण्यात आलेल्या उत्खननातून केवळ पुरावशेषांचा शोध घेण्याऐवजी तेरच्या तत्कालीन सामाजिक-आर्थिक जीवनाचा, धार्मिक परिस्थितीचा, नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराचा, कच्च्या मालाच्या उपयोगाचा तसेच वस्तीच्या स्वरूपाचा आणि विकासाचा सखोल अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.
इ. स. 2014-15 च्या उत्खननाच्या संदर्भात तेरचे पुरातत्त्वीय क्षेत्र अत्यंत व्यापक असल्याचे दिसते. आधुनिक काळात घरे बांधताना, विहिरी खोदताना किंवा शेती करताना आजही या प्राचीन थरांमधून पुरावशेष बाहेर पडतात. टेराकोटा मृण्मूर्ती, हस्तिदंत, शंख, हाडे, दगड आणि धातूच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू तेरच्या मातीमधून मिळाल्या आहेत. या पुरावशेषांपैकी काही तेर येथील शासकीय संग्रहालयात जतन केले आहेत.
इ. स. 2014-15 मध्ये तेरमधील बैराग पांढर आणि कोट या दोन परिसरांमध्ये उत्खनन करण्यात आले. तेरणा नदीच्या डाव्या काठावर असलेला बैराग पांढर हा चार ते पाच मीटर उंच प्राचीन मातीचा ढिगारा आहे. या परिसरात राख, मातीची भांडी आणि काही हाडे असलेले तीन खड्डे आढळले. बैराग पांढरच्या विविध स्तरांमध्ये लाल मृद्भांडय़ांचा मोठय़ा प्रमाणावर वापर झालेला दिसतो. विशेषत ‘न्न्’ आकाराच्या वाटय़ा मोठय़ा संख्येने आढळल्या. तेरमधील दुसरा महत्त्वाचा परिसर म्हणजे कोट. या ठिकाणी सुमारे सात मीटर उंच सांस्कृतिक संचयाचा अभ्यास करण्यात आला आणि एकूण 28 स्तर ओळखले गेले. सर्वात वरच्या स्तरांवर आधुनिक हस्तक्षेपाचे पुरावे होते. त्याखाली मध्ययुगीन स्तर, दगडी पाया, विटांचे अवशेष, मातीची भांडी, जळण्याच्या खुणा, छपराची कौले, कोळशाचे तुकडे आणि विविध वस्तीशी संबंधित पुरावे आढळले. काही स्तरांमध्ये दगडी फरशी आणि बांधकामाचे पुरावे होते. या दीर्घ सांस्कृतिक क्रमामुळे तेरमधील वस्ती एकाच काळात निर्माण झालेली नसून दीर्घकाळात तिचे विविध टप्प्यांत परिवर्तन झाले असल्याचे दिसते.
कोट परिसरात विविध वास्तूंचे अवशेषही आढळले. दगडी फरशीसारखी रचना काही खोल्यांचा भाग असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. अशा वास्तूंच्या पुराव्यांमुळे तेरमध्ये नियोजित किंवा विशिष्ट उपयोगाच्या बांधकामांची परंपरा अस्तित्वात होती, असे दिसते. तेरच्या उत्खननातून मिळालेली मृद्भांडी प्राचीन दख्खनच्या सांस्कृतिक संबंधांचा महत्त्वपूर्ण पुरावा आहेत. येथे मिळालेली प्रारंभिक ऐतिहासिक काळातील मृद्भांडी भोकरदन, नेवासा, पूर्वीच्या तेर उत्खननातील स्तर, नाशिक, कोल्हापूर, कौंडिण्यपूर आणि पवणार येथील मृद्भांडांशी तुलनात्मकदृष्टय़ा जुळतात. लाल लेपाची भांडी, काळी-लाल मृद्भांडी, रौलेटेड वेअर, करडी मृद्भांडी, बर्निश्ड वेअर आणि रेड पॉलिश्ड वेअर अशा विविध प्रकारांचीही नोंद झाली आहे. तेरच्या उत्खननातून मिळालेल्या पुरावशेषांची संख्या आणि विविधता लक्षवेधी आहे. हस्तिदंती सील हा या पुराव्यांमधील आणखी एक महत्त्वाचा अवशेष आहे. त्यावर स्वस्तिकाचे चिन्ह आणि ब्राह्मी अक्षरे आहेत. नेवासे येथे सापडलेल्या एका सीलशी त्याचे साम्य असल्याचे अहवालात नमूद केले असून ते बहुधा सातवाहन काळाशी संबंधित असावे, अशी शक्यता व्यक्त केली आहे. काही तांब्याची नाणी सातवाहन काळाशी संबंधित असावीत, असे अहवालात नमूद केले आहे.
तेरच्या उत्खननाने प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहण्याची एक महत्त्वाची खिडकी उघडली आहे. प्राचीन तगर हे व्यापारी केंद्र होते, हा साहित्यिक पुराव्यांवर आधारित निष्कर्ष होता; परंतु उत्खननाने त्या व्यापारामागे असलेले उत्पादन, कारागिरी, दैनंदिन जीवन, धार्मिक विविधता आणि सामाजिक रचना यांचे अनेक पैलू समोर आणले. शंखाच्या बांगडय़ांपासून काचेच्या मण्यांपर्यंत, कापड निर्मितीशी संबंधित साधनांपासून धातुकामाच्या क्रुसिबल्सपर्यंत आणि तांब्याच्या नाण्यांपासून लाकडी बांधकामापर्यंत प्रत्येक पुरावा तेरच्या इतिहासाची एक स्वतंत्र बाजू सांगतो.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)





























































