
चाप राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून तीन राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी तीन राज्यातील विजयासाठी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं, तर तेलंगणातील निकालांसाठी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं अभिनंदन केलं. भाजपची ‘बार्गेनिंग पावर’ वाढल्याचं पत्रकारांनी विचारल्यानंतर संजय राऊत यांनी मिंधे गट आणि अजित पवार गटाला लक्ष्य केलं.
आता महाराष्ट्रात काय होणार? तर 2014 मध्ये झालं तेच होणार. मोदींची लहर दिसल्यानंतर भाजपनं शिवसेनेची साथ सोडली. आता पुन्हा एकदा भाजपला एक लाट दिसत आहे. तर मला चिंता आहे की जे गद्दार सत्तेत जाऊन बसलेत त्यांचं काय होणार? अब आपका क्या होगा कालिया? असं गद्दार गटांना विचारलं जाणार, असं संजय राऊत म्हणाले.
‘चार राज्यांचे निकाल आता पूर्णपणे हातात आले आहेत. निकाल आश्चर्यकारक, अनपेक्षित असले तरी आम्ही लोकशाही मानणारे लोकं आहोत. लोकशाहीत अशाप्रकारचा जनादेश जरी आपल्या विरोधात गेला तरी फार आकांडतांडव न करता हा जनादेश स्वीकारायचा असतो’, असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मात्र त्यासोबतच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निर्णयानंतर देखील इंडिया आघाडी कायम राहिल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक
‘6 डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होती. चर्चा होईल. इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांना या पाच राज्यांच्या संदर्भात छोट्या-मोठ्या तक्रारी आहेत. की त्यांना या निवडणुकांमध्ये विश्वासात घेण्यात आलं नाही. सगळ्यांना सोबत घेतलं असतं तर संपूर्ण चित्र बदललं असतं असं म्हणणार नाही, पण थोडा फायदा झाला असता’, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
निवडणूक आयोगानं EVM बद्दलच्या शंकांची दखल घ्यावी
‘काल चार राज्यांमध्ये तीन राज्यात भाजप जिंकली. मध्य प्रदेशातील निकाल फक्त आश्चर्यकारक नाहीत तर धक्कादायक आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत त्यावेळी दिग्विजय सिंग यांची अशी भूमिका होती की EVM संदर्भात इंडिया आघाडीत चर्चा व्हायला हवी. हे सगळं संशयास्पद आहे. कपिल सिब्बल यांचीही तशीच भूमिका होती. आमची भूमिका होती की सरकार त्यांच्यावर काही भूमिका घेणार नाही, आपण पुढे जाऊ या. निवडणूक आयोगानं लोकांच्या मनात EVM विषयी जी शंका आहे ती समजून दखल घेतली पाहिजे. पण काल जो EVM जनादेश आला आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे’, असं संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचं अभिनंदन
‘रविवारी जो जनादेश ईव्हीएमच्या माध्यमातून आला त्याचा आम्ही स्वीकार करतो. भाजप पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा यांचं अभिनंदन करतो. तेलंगणातील निकालांबद्दल राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो. तिथला विजय विशेष आहे. कारण पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपची फौज तिथे उतरून देखील काँग्रेसने तिथे बाजी मारली आहे’, असंही संजय राऊत म्हणाले.


























































