
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्हयामध्ये बिबट्याची दशहत दिवसेंदिवस वाढत चालली असून ती कमी होण्यास तयार नाही, संगमनेर, अकोले पाठोपाठ आता नगर तालुक्यातसुध्दा अशा घटना घडू लागल्या आहेत. हिवरे झरे येथे बिबट्या आढळुन आल्याने गावकर्यांमध्ये चांगलीच घबराट परसली असून नागरीक आता रात्री घरातुन बाहेर घेण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नगर तालुक्यातील कामरगाव येथे दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतांनाच हिवरे झरे, काळेवाडी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये कामरगावध्ये (ता. नगर) बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते. तर संतप्त गावकर्यांनी बिबट्यावर केलेल्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यु झाला. ही घटना ताजी असतांनाच तालुक्यातीलच हिवरे झरे व काळे वाडी परिसरात दोन दिवसांपासून बिबट्या दर्शन देत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात मुक्काम असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. परंतु बिबट्यासह त्यांची दोन पिलेही असल्याचे सांगण्यात येत असल्याने या बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण केली असुन वन विभाग यावर काय भुमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

































































