
सामना प्रतिनिधी । बीड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबीत करणारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला. बीडमध्ये पत्रकार, शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी या चित्रपटाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो मोफत ठेवला होता. क्षणाक्षणाला जय भवानी जय शिवाजीचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’च्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले. यावेळी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड जयघोष, आतषबाजी करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांनी या प्रयोगाचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व शिवसैनिकांनी या चित्रपटास हजेरी लावली.
शिवसेनाप्रमुखांच्या जीवनातील प्रसंग जिवंत करणारा चित्रपट पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांनी आज ‘या अशा मल्टिप्लेक्स ’मध्ये घेतला. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या वैभवापर्यंतचे सर्व प्रसंग या चित्रपटात मूर्तीमंत उभे केले आहेत. बाळासाहेबांचा स्वाभिमान, त्यांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती, मराठी माणसाविषयीची अंतरीक तळमळ आणि मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देण्याची त्यांची ठाकरे शैली या सर्वांचे प्रतिबिंब या चित्रपटात अगदी हुबेहुब उमटले आहे. नवाजुद्दीन यांनी बाळासाहेबांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे केली आहे. अमृता राव यांनीही माँ साहेब उत्कटपणे सादर केले आहे.
































































