
पालघर जिह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डॉ. विश्वास वळवी यांनी मिंधे गटाला रामराम ठोकत आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवालय येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. राजकारणातून समाजकारण करत शिवसेनाप्रमुखांच्या तत्त्वावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून पालघरच्या गावपाडय़ात शिवसेनेसाठी काम करणार असल्याची ग्वाही डॉ. विश्वास वळवी यांनी या वेळी दिली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.
डॉ. विश्वास वळवी यांनी विश्वास फाऊंडेशनच्या माध्यमातून पालघर जिह्याच्या गावपाडय़ात मोठे सामाजिक काम केले आहे. जिह्याच्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर आणि सक्रिय आहेत. विश्वास फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब आणि गरजूंना मोठी मदत केली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा मोठा लाभ शहरी व आदिवासी बांधवांना झाला होता. वंचित घटक, आदिवासी आणि विद्यार्थी यांच्यासाठी विश्वास फाउंडेशन मोठा आधार ठरली आहे. डॉ. वळवी यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या वेळी संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख विकास मोरे, राजेंद्र पाटील, पालघर जिल्हा संघटक नीलम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, भारती कामडी, उपजिल्हाप्रमुख अनुप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



























































