
देशाच्या कानाकोपऱ्यात राग आणि सुडाच्या भावनेतून खून, बलात्कार,अॅसिड हल्ला इ. अशा अनेक घटना घडत असतात. रागाच्या भरात बऱ्याच वेळा चुकिचे पाऊल उचलले जाते आणि त्याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. अशीच एक हादरवुन सोडणारी घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. आम्ही फोनवर बोलत आहोत, मोठ्याने बालू नकोस, कामाचे आगाऊ घेतलेले पैसे परत दे असे म्हटल्याच्या रागातून कामगाराने ठेकेदाराचा चाकुने छातीवर वार करत खून केला आहे.
नगर जिल्ह्यातील तांबटकर मळा (गुलमोहोर रोड) येथे ही घटना काल (दि.28) रात्री साडेदहा वाजता घडली. मयत ठेकेदार आणि आरोपी कामगार हे दोघेही परप्रांतीय आहेत. कमलेश कुशावह हा ठेकेदार कुटुंबियांसह गुलोमोहोर रोडवरील तांबटकर मळा येथे चार वर्षापासून कामानिमित्त राहत आहे. त्याच्याकडे त्याच्या गावाकडील चांद आलमनूर आलम खान यांचे सिमेंट ब्लॉक, कंपाऊंड तयार करण्याचे काम चालू होते. आरोपी बिंदाप्रसाद कालीदीन रावत हा कमलेश यांच्यासोबत सात-आठ महिन्यांपासून काम करीत होता. त्यांच्यासोबत त्यांच्या गावाकडील आणखी काही मजूर काम करीत होते. कमलेश हे त्यांच्या गावाकडील मुलांना येथे कामावर आणत असून ते ठेकेदार होते. दरम्यान, रावत याने कमलेश यांच्याकडून कामाचे आगाऊ पैसे घेतले होते.
काल (दि. 28) रात्री साडेदहा वाजता कमलेश यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले. कुशावह पती- पत्नी भाच्याबरोबर फोनवर बोलत असताना, बिंदाप्रसाद रावत हा तेथे आला व मोठ्याने बोलू लागला. त्यावर कमलेश यांनी त्यास आम्ही फोनवर बोलत आहोत. तु शांत बस असे सांगितले. त्यावर रावतने कमलेश यांना शिवीगाळ केली. त्यावर कमलेश त्यास म्हणाले की, तुला आमच्याकडे काम करायचे नाही तर तु कामाचे आगाऊ घेतलेले पैसे परत दे असे म्हटल्याचा राग आल्याने रावतने कमलेश यांना मारहाण केली. कमलेश यांच्या पत्नीने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात बिंदाप्रसाद रावत याने त्याच्या कमरेला लावलेला चाकु काढला आणि कमलेशच्या छातीवर मारला.
छातीवर वार होताच कमलेश जाग्यावर कोसळला आणि कमलेशला तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले. तोपर्यंत इतर मजुरांनी बिंदाप्रसाद रावत यास पकडून ठेवले होते. कमलेश यांना रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी कमलेश यांना मृत घोषीत केले. बिंदाप्रसाद रावतला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत.



























































