
सामना प्रतिनिधी । मुंबई
खार पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱया एका वृद्ध दांपत्याची हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोपाळदास मखिजानी (८५) आणि दयानानक मखिजानी (८०) अशी या दांपत्याची नावे आहेत. आज सकाळी बेडरूममध्ये दोघांचे मृतदेह सापडले. दरम्यान, घरातले दागिने आणि त्यांच्याकडे २४ तास केअरटेकरचे काम करणारी एक मोलकरीण गायब आहे. रात्री उशिरा खार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते.
खार येथील २१ व्या रस्त्यावर असलेल्या ‘एकता एलिट’ या हायप्रोफाईल इमारतीत मखिजानी दांपत्य राहत होते. त्यांचा एक मुलगा सिंगापूरला तर दुसरा अमेरिकेत आहे. त्यामुळे सदर वृद्ध दांपत्य एकटेच राहत होते. त्यांच्याकडे घरकाम, जेवण बनविण्यासाठी, ड्रायव्हर आणि केअरटेकर या कामासाठी चार नोकर होते. घरकाम करणारी मोलकरीण आज सकाळी आठच्या सुमारास कामासाठी आली असता घराचा दरवाजा आतून उघडला जात नव्हता. त्यामुळे तिने ही बाब वॉचमनला सांगितल्यानंतर वॉचमन व सोसायटीच्या लोकांनी शिडी लावून बेडरूममध्ये पाहिले असता मखिजानी दांपत्य निपचित पडलेले आढळले. त्यामुळे खार पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेले असता दाखल करण्यापूर्वी त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच मखिजानी यांच्या घरातील दागिने चोरीला गेले असून २४ तास केअरटेकरचे काम करणारी मोलकरीणदेखील गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. खार पोलिसांनी याप्रकरणी हत्या, चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
१५ दिवसांपूर्वीच कामाला लागली होती
मखिजानी कुटुंबाकडे एक महिला केअरटेकर म्हणून कामाला होती, पण ती नोकरी सोडून गेली. त्यांनतर १५ दिवसांपूर्वीच दुसऱया महिलेला केअरटेकर म्हणून कामाला ठेवण्यात आले होते, परंतु तिची माहिती दुसऱया नोकरांकडे नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.१५ दिवसांपूर्वीच कामाला लागलेली ती मोलकरीण बेपत्ता असून तिनेच ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. तसेच ती बिहार किंवा झारखंडची असावी, असेही समजते. ती कोणाच्या ओळखीने मखिजानी यांच्याकडे कामाला लागली होती याचा पोलीस तपास करीत आहेत.
सीसीटीव्ही नसल्याने पंचाईत
मखिजानी कुटुंब राहत होते त्या इमारतीत सीसीटीव्ही नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ती केअरटेकर मोलकरीण इमारतीबाहेर किती वाजता गेली, तिच्यासोबत कोणी होते का, तसेच इमारतीत बाहेरची कोणी व्यक्ती आली होती का याचा शोध घेणे कठीण बनले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. वॉचमनकडे अधिक तपास सुरू असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.





























































