शिवसेनाप्रमुख लखनौला गेले होते, हे काही जणांना दाखवण्याची आवश्यकता; स्मारकाच्या कामाचा आढावा घेत उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दादरमध्ये हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.स्मारकाचे बरेचसे बांधकाम झाले आहे. जनतेसाठी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक लवकरात लवकर खुले व्हावे, असे आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या स्मारकासाठी सुरुवातीपासूनच आम्ही सूचना करत आहोत. त्यांच्या डिझाइनपासूनच्या कामाकडे आमचे लक्ष आहे. तसेच याबाबत अनेकांशी आपली चर्चा होत असते. आता प्रत्यक्ष काम म्हणजे स्मारकात फोटो, लेख, व्यंगचित्रे कोणत्या ठिकाणी असतील. त्याच्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. तसेच परिसरातील झाडांना धक्का न लावता परिसरातील काम करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जनतेकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे दुर्मिळ फोटो, व्हिडीओ किंवा लेख असल्यास त्यांनी ते आपल्यापर्यंत पोहचवावे. ते या स्मारकात मांडता येतील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या प्रकरणी बाळासाहेबांवर केस झाली होती. त्यावेळी ते लखनौला गेले होते. त्या घटनेच्या बातम्या आणि फोटो मिळाले आहेत. इतर साहित्य मिळवण्याचाही आमचा प्रयत्न आहे. अयोध्या प्रकरण आणि शिवसेनाप्रमुख लखनौला गेले होते, हे काही जणांना दाखवण्याची आवश्यकता आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

बांधकाम लवकरात लवकर व्हावे, असे आपल्याला वाटते. पण सध्या आव्हानात्मक परिस्थिती आहे. एका बाजूला समुद्र आहे. दुसऱ्या बाजूला महापौर बंगला आहे. ती पुरातन वारसा वास्तू आहे, त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. त्याला कोठेही धक्का न लावता आपल्याला हे स्मारक करायचे आहे. त्या वास्तूशी आमचा भावनात्मक बंध आहे. तसेच परिसरातील झाडांना धक्का न लावता आपल्याला हे करायचे आहे. स्मारकातील दृकश्राव्य सोयींबाबत विचारले असता, याबाबत आताच सर्व सांगणे योग्य होणार नाही. स्मारक सुरू झाल्यावर सर्वांना त्याबाबतची माहिती मिळेल, असेही ते म्हणाले.