
नारेगाव परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा त्याच्या तीन साथीदारांनी गळा चिरून मृतदेह पेटवून दिल्याची घटना आज मंगळवारी सकाळी कुंभफेळ येथील पेट्रालपंपासमोर उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मयताच्या सोबत असलेल्या रेकॉर्डवरील त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षा जप्त केल्या हा खून चोरीच्या मालाच्या वाटणीवरून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नारेगाव परिसरातील शेख आमीर शेख नजीर ( 24 ) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चोरी, घरफोडी आणि धाक दाखवून लुटण्याचे गुन्हे दाखल आहेत. आमीर हा सोमवारी दुपारी चार वाजता घरातून गायब झाला होता. आज सकाळी कुंभफेळ भागात इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळील एका शेतात अर्धवट जळलेल्या अवस्थेतील 25 वर्षीय तरूणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली असता तो आमीर शेख असल्याचे समोर आले, शेख आमीर हा त्याचे साथीदार शेख कामील ऊर्फ गुड्डू शेख जमील (22 ) , शेख चाँद शेख गणी ( 19 दोघेही रा. नारेगाव ) बिहारीसह रिक्षाने मंगळवारी मध्यरात्री कुंभफेळ येथे गेले होते. चौघांनीही तिथे नशा केली. त्यानंतर आमीर शेखचा पहाटे दोन ते चार वाजेदरम्यान प्रथम गळा चिरला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रिक्षामधील पेट्रोल टाकून त्याचा मृतदेह पेटवून पळ काढला. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान , गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तात्काळ शोध लागावा म्हणून करमाड पोलिसांनी मदत केल्यानंतर त्या दिशेने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक फुंदे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंखे यांच्या पथकाने शेख तामील यास ताब्यात घेतले. तर करमाड पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांनी शेख चाँद शेख गणी यास ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा पोलीसांनी जप्त केली, या गुन्ह्यातील बिहारी आरोपी फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली .
वाटणीवरून खून झाल्याचा पोलिसांचा संशय
नारेगावमधील शेख आमीर शेख नजीर ( 24 ) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून , त्याच्याविरोधात शहरात चोरी, घरफोडी, धाक दाखवून लुटण्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो महिनाभरापूर्वी चोरीच्या गुन्ह्यातून कारागृहातून सुटला होता. शेख आमीर हा नशेबाज होता. चोरीच्या मालाच्या वाटणीवरून खून झाल्याच्या संशयावरुन ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने नारेगाव परिसरातील दोघांना ताब्यात घेतले आहे.





























































