मुंडण करून ‘रामनाम सत्य है’ जप; जनतेने काढली महायुतीची अंत्ययात्रा

मतदारांशी गद्दारी करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या नेत्यांमध्ये मतदारांमध्ये जबरदस्त रोष दिसून येत आहे त्याचा प्रत्यय नांदेडमध्ये महायुतीच्या नेत्यांच्या पह्टोंना चपलांचा हार घालून तिरडीवरून काढलेल्या अंत्ययात्रेचा व्हायरल व्हिडीओ पाहून येत आहे. त्यामुळे मिंधे सेनेपासून भाजप आणि अजित पवारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात दुसऱया टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात महायुतीने भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. पण महायुतीच्या या उमेदवारासहच महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या विरोधात नांदेडमधील जनतेत रोष असल्याचे या व्हायरल व्हिडीओवरून दिसत आहे.

पण स्थानिक जनतेचा राग फक्त अशोक चव्हाण यांच्यावरच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरही आहे. म्हणूनच जनतेने या सर्व नेत्यांचे पह्टो तिरडीवर ठेवले, पह्टोच्या बॅनरला चपलांचा हार घातला आणि  तिरडीला खांदा देणाऱया संतप्त लोकांनी मुंडण केले होते. राम नाम सत्य है…चा गजर करीत या सर्व नेत्यांच्या पह्टोंची अंत्ययात्रा काढली. बॅनरवर श्रध्दांजली असे नमूद केले होते. या अंत्यात्रेत मोठय़ा संख्येने मतदार सहभागी झाले होते. त्यावरून जनतेच्या मनातील रोषाची कल्पना येते. त्यामुळे या निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपला मोठा फटका बसणार अशी चिन्हे असल्याचे जाणकार सांगतात.

प्रतिस्पर्ध्यांशी हातमिळवणी

2019 मधील निवडणुकीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकरांना 4 लाख 86 हजार 806 मते तर अशोक चव्हाण यांच्यावर 4 लाख 46 हजार 658 मतदारांनी विश्वास दर्शवला होता. नांदेडच्या जनतेने अशोक चव्हाण यांना सुमारे 39.55 टक्के मते दिली होती. पण आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांनी केलेला विश्वासघात मतदारांना अजिबात रुचलेला दिसत नाही.

 

मोदींच्या फ्लॉप सभेचा व्हिडीओ व्हायरल

नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी मामा चौकातील मोदी ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाडय़ातील पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. पण या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे  ही सभा फ्लॉप झाल्याचे नमूद करणार व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर फिरत आहेत. नांदेड, लातूर, हिंगोली या तीन जिह्यांतील जनता एकत्र करूनही खुर्च्या रिकाम्या अशी कमेंटही आहे.