दोनशे अभिजात साहित्यकृतींचे पुनर्प्रकाशन; ‘पॉप्युलर’ची शतक महोत्सवी वाटचाल

पॉप्युलर प्रकाशन संस्थेला उद्या 1 मे रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर पॉप्युलरने कादंबरी, कविता, कथासंग्रह, ललित अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये 5 हजारांहून अधिक ग्रंथांची निर्मिती केली आहे. हाच पायंडा कायम ठेवत शतक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त पॉप्युलर प्रकाशन 200 अभिजात साहित्यकृतींचे पुनर्प्रकाशन करणार आहे. कविवर्य ग्रेस, ना. धों. महानोर, गो. स. सरदेसाई यांच्या ‘मराठी रियासत’चे आठ खंड, अशोक रानडे, देवधर यांची संगीतावरील पुस्तके अशी दोनशे पुस्तके पुन्हा प्रकाशित करणार असल्याचे पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी सांगितले.

प्रकाशन संस्थेविषयी

ग्रॅण्ट रोडजवळ गणेश रामराव भटकळ यांनी सुरू केलेलं  पॉप्युलर बुक डेपो ते मराठीतील प्रसिद्ध प्रकाशन संस्था असा शंभर वर्षांचा पॉप्युलरचा प्रवास आहे. 1952 मध्ये रामदास भटकळ यांनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी पॉप्युलर प्रकाशनचा मराठी विभाग सुरू केला. पॉप्युलरच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे  हे पॉप्युलरचे लेखक आहेत. पॉप्युलरने साहित्य चळवळीच्या विविध अंगांत सहभाग घेतला. स्वातंत्र्योत्तर साहित्य चळवळीत, नवकथा, नवकविता, मराठी रंगभूमीवरील नवीन प्रवाह पॉप्युलरच्या माध्यमातूनच वाचकांसमोर आले. पॉप्युलरच्या इंग्रजी प्रकाशनाची सुरुवात 1925 सालापासून वैद्यकीय पुस्तकांच्या प्रकाशनाने झाली.