
मोदी सरकारच्या काळात रुपयाची अधोगती झालेली आहे. ज्याची भीती होती ती आज अखेर खरी ठरली. रुपयाने अखेर आज शंभरी गाठली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ‘वन इयर फॉरवर्ड’ विनिमय दर 100 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला. शंभरी गाठल्यानंतर रुपया काही प्रमाणात सावरला आणि 96.37 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी रुपयाचा विनिमय दर 58 ते 59 रुपये प्रति डॉलरच्या आसपास होता. त्यानंतर आजपर्यंत रुपयाची पार अधोगती झाली आहे. रुपया मजबूत होण्याऐवजी रुपया घसरतच गेला. तो एवढा घसरला की, आज ‘वन इयर फॉरवर्ड रेट’ अर्थात 1-वर्षाचा फॉरवर्ड दर चक्क 100 रुपये प्रति डॉलरवर रुपयाचा विनिमय दर गाठला. हा दर म्हणजे वर्षभरानंतर हा रुपयाचा विनिमय दर असेल. म्हणजेच पुढील वर्षभरात रुपयाची आणखी अधोगती होणार आहे.
युद्धानंतर घसरण सुरूच
सध्याच्या विनिमय दरांमध्ये फार सुधारणा होण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी रुपया सर्वप्रथम नव्वदीत गेला होता. इराण युद्ध सुरू होताच रुपया आणखी कमकुवत झाला आणि 6 टक्क्यांनी घसरला. दरम्यान, कालच्या तुलनेत 49 पैशांनी वधारून रुपया 96.37 च्या पातळीवर बंद झाला. कच्च्या तेलाचे दर घसरल्यानंतर रुपया सावरला.




























































