
क्षितिज झारापकर,[email protected]
चित्रपटांप्रमाणेच मराठी नाटकांतही गाणं हवंहवंसं वाटतं. संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा असलेल्या नाटकांशिवाय बहुतेक नाटकांमधून साध्या, सोप्या गाण्यांची पेरणी असतेच आणि ही गाणी वर्षानुवर्षे ओठी रुळतात. प्रशांत दामलेंचं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं…’ हे याचे उत्तम उदाहरण.
माझे सत्तरी गाठलेले वडील परवा मित्रांबरोबर पार्टी करून जरा उशिरा घरी आले अणि माझ्या थोडय़ा रुसलेल्या आईला ‘नच सुंदरी करु कोपा मजवरी धरी अनुकंपा’ म्हणत मला मिश्किलपणे डोळा मारत होते. मला ते त्यावेळी व्हॉट्सऍपवरच्या त्या स्माईलीइतकेच निरागस वाटले. मनात विचार आला की, 1872 मधल्या ‘सौभद्र’च्या पदाची काय जादू आहे की, 140 वर्षांनंतरदेखील अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत महाराष्ट्राला भुरळ घालतंय. लक्षात आलं की, फक्त संगीत नाही, त्यातील शब्द, भाव, सूर अणि ताल हे सगळंच. थोडक्यात मराठी माणसाला भुरळ घालतात ती मराठी गाणी.
1870च्या सुमारास मराठी रंगभूमी संगीताकडे वळली आणि नाटकात गाणी आली. खरं तर गाणी नाहीत, नाटय़संगीत सुरू झालं. शात्रीय संगीताला दरबारी संगीतही म्हणतात. शात्रीय संगीताला लागणारी अनुशासित बैठक ही प्राचीन काळात राजदरबारातच शक्य असल्याने तसं घडलं असेल कदचित; पण ही शिस्त मराठी नाटकाला जवळची होती. नाटय़ानुभव ही एक विलक्षण अनुभूती आहे असं मानणाऱया रंगभूमीने शात्रीय संगीत लगेच आणि पूर्णपणे आत्मसात केलं आणि संगीत नाटकाचे पर्व सुरू झाले. मराठी रंगभूमी ही कोणतीही चांगली गोष्ट आत्मसात करणारी आहे. तिच्या हे पटकन लक्षात आलं की, केवळ रागदारी नाटकाला पूरक नाही. आणि मग आली गडकरी, खाडिलकरांसारखी लेखक मंडळी आणि गोविंद बल्लाळ देवल, बालगंधर्वां’सारखी सादरकर्ती मंडळी ज्यांनी खऱया अर्थाने मराठी नाटकात गाणी आणली. सौभद्र, मानापमान, मृच्छकटिक, संशयकल्लोळ, शारदा यांसारख्या अनेक नाटकांनी मराठी रसिकांना भुरळ घातली.
स्वातंत्र्यानंतरचा काळ झपाटय़ाने बदलत होता. समाजमन परिवर्तित होत होतं. साहजिकच’ संगीतही बदलत होतं. साठीच्या दशकात मराठी नाटकातली गाणी बदलली ती एका अवलियाने. काळजात कटय़ार घुसावी तशी या अवलियाची गाणी थेट मराठी रसिकांच्या ह्रदयात जाऊन ह्रदय गलबलून टाकू लागली आणि चाफेकळीसारखी मत्स्यगंधा आली घेऊन मराठी नाटकातल्या गाण्यांचं अभिषेकी पर्व. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेली नाटकातली गाणी गाजली; कारण ती जनमानसातलं संगीत घेऊन आलेली. नटाची संवादाची आणि गाण्याची पट्टी सारखी असली पाहिजे हे पंडितजींनी पहिल्यांदा नाटकात आणलं. ययाती देवयानी, लेकुरे उदंड झाली, मीरामधुरा, महानंदा अशा 25 नाटकांना त्यांनी संगीत दिलं.
1985 साली ‘सुयोग’ या नाटय़संस्थेने आचार्य अत्रे यांचं ‘मोरूची मावशी’ हे नाटक करायचं ठरवलं. अशोक पत्की यांचं संगीत होतं. मोरूची मावशीने गद्यात अडकलेल्या मराठी रंगभूमीला चांगलाच इंगा दाखवला. टांग टिंग टिंगा गाजलं. गाजलं म्हणजे न भूतो न भविष्यति गाजलं. आणि सुरू झालं अशोक पत्की–प्रशांत दामले हे मराठी नाटकातील गाण्यांचं नवं पर्व. ब्रह्मचारी, चार दिवस प्रेमाचे, प्रियतमा, जादू तेरी नजर आणि एका लग्नाची गोष्ट ही आधुनिक संगीत नाटकं या जोडीने दिली. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता या ओरिजिनल गाण्यातला फक्त स्वल्पविराम बदलून पत्कीकाकांनी जादू केली. यमुना जळी, खेळू, खेळ कन्हैय्या, का लाजता इतकंच केल्याने हे नाटकातलं गाणं तरुण प्रेक्षकांच्या मनात बसलं. शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपटातलं जादू तेरी नजर अणि क क क क किरण गाजलं होतं. पत्कींनी त्याच ‘जादू तेरी नजर’ची चाल अशी काही बदलली की मूळ चाल विसरून लोक नव्या चालीच्या प्रेमात पडले.
या जोडीचा मानबिंदू ठरली ती ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकातली दोन गाणी. ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘ती परी अस्मानीचा’ या दोन्ही गाण्यांनी आजतागायत मराठी रसिकमनावर रुंजी घातलेली आहे. आता प्रशांत दामले ही दोन गाणी पुन्हा एकदा एका नव्या नाटकातून आपल्यासमोर आणत आहेत. ही दोन गाणी पुन्हा एकदा रसिकांना भुरळ घालायला सज्ज आहेत. प्रशांत दामले आणि अशोक पत्की या जोडीचं पर्व अजून अबाधित आहे. ते संपलेलं नाही.
























































