
अंगाला चिखल आणि मच्छर न चावण्याचे लोशन लावून नदीकाठीलगत असलेल्या सोसायट्यांमधील फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 9 गुन्हे उघडकीस आणून 5 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीने ओैंध, बाणेर परिसरात घरफोडीचा हैदोस माजविला होता. मात्र, पथकाने अतिशय कौशल्याने तपास करत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. राकेश इंदू मच्छा (वय 21), सुरेश गुमानसिंग मावी (वय 20), प्यारसिंग भुल्ला अलावा (वय 20), बियानसिंग उर्फ भाया ठाकूरसिंग भुढड (वय 20), महेंद्रसिंग कलमसिंग डावर (वय 20), महिंदर धानसिंग अजनार (वय 20), कल्लू मकून देवका (वय 23, सर्व रा. धार, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ओैंध, बाणेर परिसरात नदीपात्राजवळ असलेल्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला होता. त्या पार्श्वभूमीवर चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, श्रीकांत वाघुले, बाबा दगडे यांनी सलग 15 दिवस पहाटेच्या सुमारास परिसरात पाळत ठेवली होती. त्यानंतर टोळी चोरीच्या प्रयत्नात असताना त्यांना रंगेहाथ पकडले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त रोहिदास पवार, एसीपी आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, तपास पथकाचे उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, उपनिरीक्षक रुपेश चाळके, उपनिरीक्षक महेश भोसले, रुपेश टेमगिरे, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, शेरु वाघवले, बाबा दांगडे, कुणाल माने, सुधीर माने, किशोर दुशिंग, आशिष निमसे, तेजस चोपडे, सुहास पोतदार, सचिन कांबळे यांनी केली.
ओैंध, बाणेर परिसरात नदीपात्राजवळील सोसायटीत घरफोडी करणारे आंतरराज्य चोरटे मध्यरात्री जाळ्या तोडून सोसायटीत शिरत होते. बंद फ्लॅटचे कुलुप तोडून ऐवज चोरल्यानंतर ते रात्रभर पदपाथासह डोंगर परिसरात थांबत होते. नदीपात्रात डास असल्याने बचाव करण्यासाठी चोरटे अंगाला चिखल तसेच डासविरोधी मलम लावत होते.
राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे
नदीकाठच्या फ्लॅटमध्ये चोऱ्या वाढल्यामुळे परिसरात पहाटेच्या सुमारास तपास पथकाने 15 दिवस पाळत ठेवली होती. त्यानुसार चोरट्यांचा माग काढून त्यांना रंगेहाथ अटक केली.
नीलेशकुमार महाडीक, पोलीस उपनिरीक्षक, तपास पथक





























































