
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, जुनी घड्याळे असा एकूण 4 लाख 25 हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 24 ते 30 सप्टेंबरमध्ये कोंढव्यातील साईबाबानगरमधील नजीर हाईट्समध्ये घडली. याप्रकरणी मोईनअली खान (वय 39, रा. कोंढवा ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईनअली कुटूंबियासह नजीर हाईट्समध्ये राहतात. कामानिमित्त ते 23 ते 30 सप्टेंबरदरम्यान बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि जुनी घड्याळे असा एकूण 4 लाख 25 हजारांचा ऐवज चोरुन नेला. गावाहून परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील तपास करीत आहेत.
कोथरुडमध्ये एकाच इमारतीतील पाच फ्लॅट फोडले
पुण्यात सोनसाखळी चोरीनंतर आता चोरट्यांनी घरफोड्यांकडे मोर्चा वळविला आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी कोथरुड परिसरातील उजवी भुसारी कॉलनीतील श्वेता रेसीडेन्सीमधील पाच फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, घरात मौल्यवान ऐवज मिळाला नसल्याने चोरट्यांची निराशा झाली. याप्रकरणी संतोष देशपांडे (वय 50) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशपांडे कुटूंबियासह उजवी भुसारी कॉलनीत श्वेता रेसिडेन्सी इमारतीत राहतात. त्याच इमारतीत देशपांडे यांचे कार्यालय आहे. चोरट्यांनी बंद कार्यालयाचे कुलूप उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेजारी असलेले आणखी बंद चार फ्लॅट फोडण्यात आले. मात्र, घरात चोरट्यांना काहीही मिळाले नाही. संबंधित फ्लॅट कोल्हापूरमधील व्यक्तीचा आहे. लॉकडाऊनमुळे ते मूळगावी गेले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. एल. घोडके अधिक तपास करीत आहेत.



























































