योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकापर्यंत अंमलबजावणी होते. योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केली. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावरून व्हीसीद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. नगरमधील दरेवाडीच्या मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापुरातील हसुर दुमालाच्या जिजाबाई पाटील, सांगरूळच्या लक्ष्मी साठे, अर्जुनीचे नितीन आढाव, नाशिक जिह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणच्या मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीच्या मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीच्या संगीता निकम, संभाजीनगरच्या रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीच्या सुवर्णा भुईगल यांनी मनोगत व्यक्त केले.

योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे. राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरीत्या पोहचविल्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 5 लाख घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही 5 लाख घरे बांधत आहोत. 3500 कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, 2022-23 मध्ये जल जीवन मिशनमध्ये 19 लाख कुटुंबांस नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी 1900 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही ते म्हणाले.

व्याज परतावा सुरू करा

केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली.