मुलं चोरीचे निमित्त, आर्थिक लूट करण्याच्या उद्देशाने केली मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनिल उंबरे । पंढरपूर

मुलं चोरी करणारी टोळी आली हे केवळ निमित्त आहे हल्ले करणाऱ्या ग्रामस्थांचा मुख्य उद्देश आर्थिक लूट करण्याचा होता. कोणतीही विचारपूस न करता त्यांनी दहशत निर्माण केली आणि खिशातील मोबाईल, पैसे काढून घेतले. लूटमार केल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये यासाठी बेदम मारहाण केली. सुदैवाने पोलिसांनी वेळीच मदत केली नाहीतर अनर्थ घडला असता अशी धक्कादायक माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नंदू डोंबे यांनी दैनिक सामना प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

शेत मजूर शोधण्यासाठी नंदू डोंबे आणि त्यांचे अन्य दोन सहकारी नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावात इनोव्हा गाडीतून गेले होते. गावाच्या चावडीवर बसलेल्या काही लोकांकडे त्यांनी शेतकामासाठी मजूर मिळतील का अशी विचारणा केली. पण त्यावर तेथील लोकांनी त्यांना थेट शिवीगाळ सुरु केली. हा गोंधळ सुरू असतानाच पाचपन्नास लोक तिथे जमा झाले. त्यानंतर ते एकमेकांशी आदिवासी भाषेत बोलले व त्यांनी इन्होव्हा गाडीवर दगडफेक केली. हे बघून डोंबे व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काच बसला व त्यांनी त्यांना शांत राहण्याची विनंती केली.

त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही तिघे गाडीत बसून गावाबाहेर जाण्याच्या तयारी असताना गावकऱ्यांनी आम्हाला गाडीतून ओढून बाहेर काढले आणि खिशातील मोबाईल, रोख रक्कम दहा हजार काढून घेतले. माझ्या सहकाऱ्यांच्या खिशाची झडती घेऊन त्यांची देखील लूटमार केली. असा आरोप डोंबे यांनी केला आहे. तसेच गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर गावकऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, काही वेळानंतर पोलीस तेथे आले. त्यांनी गावकऱ्यांना समजविण्याचा प्रयन्त केला मात्र गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. पोलिसांनी आम्हाला त्यांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयन्त केला पण संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली.

शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून आम्हाला मोठ्या धाडसाने पोलीस ठाण्यात आणून बसविले. आमच्या पाठोपाठ तीन हजारांचा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. आम्हाला पोलीस ठाण्याच्या बाहेर सोडा अशी मागणी करीत पोलीस ठाण्यावर दगडफेक सुरु केली. पोलिसांची अपुरी संख्या आणि मोठ्या संख्येने असलेला जमाव लक्षात घेऊन अधिकची पोलीस कुमक मागविण्यात आली.

पोलीस कुमक येईपर्यंत गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात लावलेली इन्होव्हा गाडी तोडफोड करून पेटवून दिली. परिस्थिती खूपच चिघळलेली होती. संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर चाल करून येतो कि काय अशी भीती पोलिसांसह आम्हाला देखील वाटत होती. पण मागविलेली पोलीस कुमक वेळीच पोहचली.

त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या, पोलीस आक्रमक झाल्यामुळे जमाव पोलीस ठाण्यापासून दूर गेला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आम्हाला उपचारासाठी पोलीस गाडीमधून नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत म्हसावद गावात हा गोंधळ सुरु होता.

मुलं चोरणारे चोरटे समजून मारहाण केली असे सांगितले जात आहे मात्र चोरटे इन्होव्हा गाडीतून येतात का आले तरी त्यांची खातरजमा करायला हवी. कोणतीही चौकशी नाही विचारपूस नाही पैसे काढून थेट मारहाण करणे याचा अर्थ लूट करण्याच्या उद्देशानेच मारहाण केली असा होतो.

आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो नाहीतर धुळे येथील घटनेप्रमाणे आमचा देखील मुडदा पाडला असता. आमच्यावर हे संकट ओढवले होते यापुढे अशीवेळ कोणावरही येऊ नये यासाठी शासनाने गांभीर्याने पावलं उचलायला हवीत असे  डोंबे यांनी सामनाशी बोलताना म्हटले आहे.