
सामना ऑनलाईन । ठाणे
गाडीत विसरलेला एक लाखाचा चेक चोरून तो परस्पर वटवल्याची घटना उघडकीस आली आहे. विनायक जोशी असे या भामटय़ाचे नाव असून श्रीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने चोरलेला चेक हा बेअरर असल्याने त्यावर स्वतःचे नाव टाकून त्याने एक लाखाची रक्कम हडप केली.
वागळे इस्टेट येथे राहणारे संतोष शिंदे हे काही कामानिमित्त शिवाजीनगर येथील शिवसदन इमारतीमध्ये आले होते. व्यवसायाने रंगकाम करणारे शिंदे हे आपल्या गाडीमध्ये सामान भरत होते. याचवेळेत त्यांच्याकडे असलेली कापडी पिशवी खाली पडली. त्यामध्ये सूर्या इंटरप्रायझेस लेटरहेड, स्टॅम्प तसेच एचडीएफसी बँकेचा सही केलेला बेअरर चेक होता. सदरची बाब तेथून जाणाऱया विनायक जोशी या भामटय़ाच्या लक्षात आली. त्याने पिशवी उघडून बघितली असता त्यात एक लाख रुपयांचा सही केलेला बेअरर चेक होता. सदरचा चेक घेऊन तो घोडबंदर येथील बँकेच्या शाखेत जाऊन शिंदे यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढले व पसार झाला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.































































