
सामना प्रतिनिधी । शिर्डी
लोकांना फसवून त्यांचे लाखो रुपये लुटणारी एक हायप्रोफाईल टोळी नगर पोलिसांनी पकडली आहे. शिर्डी व घोटी नाक्याजवळ कमी किंमतीत सोनं विकत असल्याचे आमिष दाखवून लोकांना लुटण्याचे प्रकार सुरू होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या टोळीला अटक केली. पण या टोळीच्या मोऱ्हक्याची संपत्ती ऐकून पोलीस देखील हैराण झाले.
टोळीचा म्होरक्या भीमाभाई गुलशनभाई सोलंकी हा मुळचा राजस्थानचा. तिथून तो गुजरातमधील बडोदे येथे राहू लागला आणि सध्या तो पुणे-सातारा-मुंबई-ठाणे भागात स्वस्तात सोनं देतो असं सांगून लोकांची लुटमार करायचा. अशीच लुटमार करत या भीमाभाईनं पुण्यात एक फार्महाऊस, एक आलिशान फ्लॅट, एक राहतं घर, ऑडी-फॉर्च्युनर-डस्टर अशा तीन महागड्या गाड्या घेतल्या आहेत. मात्र त्याला यापूर्वी कधीही अटक झाली नव्हती.
भीमाभाई आपल्या काही साथीदारांना सोन्याचं काम करणारे मजूर असल्याचं सांगून ग्राहकांना सहज फसवायचा. त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला आधी खरं सोन्या-चांदीचं नाणं दाखवून बाजारापेक्षा कमी किंमत सांगायचा. तसंच खोदकाम करताना आपल्याला हे नाणं सापडलं अशी थाप मारायचा. मात्र व्यवहार करताना खोटं नाणं गिऱ्हाईकाला सोपवून त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन पळून जायचा. असे प्रकार तो आणि त्याचे साथीदार काही वर्षांपासून करत होते. मात्र ते कुणाच्या हाती लागले नव्हते.
शिर्डी पोलिसांना ही टोळी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि काही पोलिसांना ग्राहक म्हणून नाक्यावर पाठवले. सारी खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना धरलं. पण तरी या टोळीनं पळ काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अखेर फिल्मी स्टाईलनं पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर त्यांना अटक केली.



























































