
निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार. शिवाय जनतेसाठी जनतेत जाऊन जनतेला सोबत घेऊन लढणार!
आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे? सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत निर्णय घ्यायला हवा होता, पण न्यायालयाचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी पायदळी तुडवले. महाशक्ती पाठीशी असल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही हे त्यांनी आजच्या निकालातून दाखवून दिले, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर केला. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, लोकशाहीचा खून केला. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे हे लहान मूलही सांगेल. जनता हा अन्याय कदापि सहन करणार नाही. शिवसेना गद्दारांची असूच शकत नाही, असे नमूद करत या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद बोलवून आपली प्रतिक्रिया दिली. मूळ खटला अपात्रतेचा होता, पण अपात्र कुणालाच केले गेले नाही, असे सांगतानाच, जर शिवसेनेची घटना ग्राह्य धरत नसाल तर शिवसेनेच्या आमदारांना अपात्र का नाही केले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
पक्षांतर कसे करावे हे नार्वेकरांनी दाखवून दिले
उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. नार्वेकरांनी पक्षांतरबंदी कायदा अधिक मजबूत करायला हवा होता, पण त्यांनी तो राजमार्ग बनवला. पक्षांतर कसे करावे हे दाखवून दिले. कारण पक्ष बदलण्याचा त्यांना अनुभव आहेच आणि ते पुढचा मार्गही साफ करत आहेत. कदाचित पुढेही त्यांना पक्ष बदलायचे असतील, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाकडे कधीच दिली आहे
घटनेत बदल केले अशा मिंध्यांच्या आरोपाचाही समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. शिवसेनेची घटना आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली आहे. पूर्वी शिवसेनाप्रमुख असे पद होते ते मी शिवसेना पक्षप्रमुख केले. कारण बाळासाहेबांशिवाय दुसरा शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही. ही आमच्या पक्षाची मांडणी आहे. तत्कालीन निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. 2013 मध्ये मी पक्षप्रमुख झालो तेव्हाही आयोगाकडे घटना दिली होती आणि आता 2018 मध्येही दिली, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
फडणवीसही न्यायालयाचा अपमान करताहेत
सरकार पूर्णपणे संवैधानिक मार्गाने स्थापन झाले होते असे फडणवीस म्हणतात असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, फडणवीसही तसे बोलून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण तत्कालीन राज्यपालांनी केलेल्या कारवाया चुकीच्या होत्या आणि केवळ नाइलाज म्हणून त्यांनी त्यांना मान्यता दिली होती असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. म्हणजेच हे सर्व बाद झालेले सरकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गोगावलेंच्या जॅकेटची मापं बदलायला लागली
भरत गोगावले यांचा मुद्दा यावेळी पत्रकारांनी काढला असता, त्यांचा विषय सोडा, एक दिवसाचे मंत्रीपद तरी लाभेल असे त्यांना वाटतेय, त्यांचे जॅकेट फुकटचे आहे आणि मापं बदलायला लागलीत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
पक्षप्रमुखाला अधिकार नाही, मग भाजप अध्यक्ष नड्डांचे काय? त्यांना तसेही अधिकार नाहीत!
पक्षप्रमुखाला कारवाईचे अधिकार नाहीत असेही राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितले. त्याचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की, न्यायालयाने शिवसेनेचा व्हीप आणि गटनेता मानला होता, मग न्यायालयाने या गोष्टी न बघता केल्या होत्या का? घटना मान्य नाही, मग आता निवडून आलेले गद्दार कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते? पक्षप्रमुखांना अधिकार नाही असे त्यांनी म्हटले. मग आता भाजपच्या अध्यक्षपदी नड्डा बसले आहेत त्यांचे काय? त्यांना तसेही काही अधिकार नाहीत. पक्षप्रमुखाला कारवाईचा अधिकार नाही, असे म्हणतात. प्रत्येक पक्षात नेता असतो आणि त्याचे सहकारी असतात. नेता हा दिशा दाखवत असतो. ते करणार नसेल आणि लोंढय़ात वाहून जाणार असेल तर तो नेता कसला, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
निवडणुकीआधी दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या
उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाला एक विनंतीही केली. शिवसेना पक्षाबाबतचा निर्णय नार्वेकर पहिल्या दिवशीही देऊ शकत होते. परंतु त्यांनी नको त्यात घुसून वेळकाढूपणा केला, नाटक केले, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयाने या प्रकरणात सर्वकाही तपासले आहे, आणखीही काही माहिती हवी असेल तर तीसुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. पण निवडणुकीपूर्वी दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मूळ शिवसेना कुणाची यावर अध्यक्षांनी निर्णय दिला. शिवसेना कुणाची हे महाराष्ट्रातील लहान मूलही सांगेल हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळात चुकीचा आहे आणि सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने त्याला आव्हान दिले आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला.
मिंधे मर्द नाहीत, गद्दार आहेत. स्वतःच्या वडिलांच्या नावाने मते मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो.
विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे. त्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करता येईल का हे आम्ही पाहू. दाखल करता येत असेल असे वाटत नाही. त्याच संरक्षणाचा अध्यक्षांनी गैरफायदा घेतला आहे.
देशातील लोकशाही अध्यक्षांनी पायदळी तुडवली आहेच, पण सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्वसुद्धा शिल्लक राहणार की नाही हे आता सर्वोच्च न्यायालयाने ठरवायचे आहे. अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर न्यायालयाने स्वतःहून सर्व पाहिले आहे, न्यायालयाने सुमोटो कारवाई करावी, अशी विनंती आहे.
न्यायालयात कोणत्याही खटल्यात पूर्वीच्या निर्णयांचा दाखला दिला जातो. आता सर्वोच्च न्यायालयात अशा स्वरूपाचे खटले आले तर या लवादाचा निर्णय तिथे मानला जाईल की सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश मानले जातील ही बाब आता गंभीर बनली आहे.
जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून शिवसेना संपवू असे यांच्या मनात होते, पण शिवसेना संपणार नाही आणि मिंध्यांची, गद्दारांची सेना महाराष्ट्रातील जनता मानणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू आणि अजय चौधरींची नियुक्ती ग्राह्य धरलेली आहे. न्यायालयाला काही कळत नाही असे अध्यक्षांचे म्हणणे आहे का? त्यांनी नस्ती बला स्वतःच्या अंगावर ओढवून घेतली आहे. जनता पेटून उठलेली आहे. जनता हा अन्याय मान्य करणार नाही.
मिंधे गुलाम… त्यांची गुलामशाही सुरू झाली
घराणेशाही संपली आहे अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे ताडकन उद्गारले. ती प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांसारखीच केराच्या टोपलीत टाकण्यासारखी आहे, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला. घराणेशाही संपली असे ते म्हणत असतील तर त्यांची गुलामशाही सुरू झाली आहे, गुलाम आहेत ते गुलाम, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही मॅच फिक्स होती
शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असाही निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्यावर तसे होऊच शकत नाही, कारण शिंदे आणि शिवसेना हे नाते तुटले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. न्यायाधीशांनी दोन वेळा आरोपीची भेट घेतली तेव्हाच हा निर्णय ठरला होता, असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात अनिश्चिततेचे वातावरण असते तर पंतप्रधान येताहेत ते आलेच नसते. कारण निकाल अपेक्षित होता, पण माहीत नव्हता. अध्यक्षांचा दावोसचा दौराही आधीच जाहीर झालेला आहे. म्हणजेच ही सेटिंग होती, मॅच फिक्सिंग होती.
उबाठा काय… अन्यायाविरुद्ध उभा ठाकलोय मी
यापुढे उबाठा म्हणूनच तुम्ही पुढे वाटचाल करणार का, अशा माध्यमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी रोखठोक उत्तर दिले. उबाठा काय उबाठा, माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उबाठा काय, मग बाकीच्यांच्या आईवडिलांची नावेही तुम्ही तशीच लावणार का आणि उबाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी. या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे, अशा स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बजावले.
मिंधेंची शिवसेना महाराष्ट्रातील जनता मानणार नाही. शिंदे आणि शिवसेना हे नाते तुटलेले आहे. शिवसेना शिंदेंची कधीही होऊ शकत नाही.
पक्षांतर कायदा मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसे करावे, पक्षांतराचा राजमार्ग कसा असावा हेच अध्यक्षांनी दाखवून दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाला आमची विनंती राहील… येणाऱ्या निवडणुकीच्या आधी ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या!



























































