
यंदा मुंबई विभागाने बारावीच्या निकालात निराशाजनक कामगिरी केली आहे. इतर विभागीय शिक्षण मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 90.91 टक्के इतका लागला आहे. देशभरात मागील दोन वर्षांपासून मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळाला. इतर जिल्ह्यांत ऑफलाइन शिक्षण सुरू झाले तरी मुंबईत मात्र कोरोनामुळे शाळा-कॉलेज ऑनलाइनच सुरू होत्या. याचा परिणाम यंदाच्या निकालात पाहायला मिळाला आहे. निकालावर नजर टाकल्यास कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईच्या शहरी भागात बारावीचा निकाल घसरला आहे.
मुंबई विभागातून परीक्षा दिलेल्या 3 लाख 23 हजार 563 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागस्तरावर ठाणे, पालघर आणि रायगड या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत चमकदार कामगिरी केली आहे. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या सर्व शाखांमध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी मुंबईकर विद्यार्थ्यांच्या पुढेच आहेत.
सायन्स शाखेतून मुंबई विभागातील 97 हजार 118 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 93 हजार 616 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सायन्स शाखेचा निकाल 96.39 टक्के इतका आहे. तर आर्ट्स शाखेतून परीक्षेला बसलेल्या 47 हजार 835 विद्यार्थ्यांपैकी 40 हजार 609 उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 84.89 टक्के आहे. कॉमर्सचा निकाल 89.49 टक्के लागला. या शाखेतून परीक्षा दिलेल्या 1 लाख 74 हजार 220 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 55 हजार 911 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यावसायिक आणि आयटीआय शाखांचा निकाल अनुक्रमे 91.78 आणि 90.65 टक्के इतका लागला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा दिलेल्या 4 हजार 283 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 931 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर आयटीआयला बसलेल्या 107 विद्यार्थ्यांपैकी 97 जण उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव ही यंदाच्या परीक्षेतील मुख्य अडचण होती, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी सांगितले. मुंबईतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या इतर विभागीय शिक्षण मंडळांपेक्षा जास्त आहे. या विद्यार्थीसंख्येला एकावेळी सामावून घेणारे शाळा तिथे परीक्षा केंद्र सुरू करण्याचे कठीण आव्हान विभागाने तंतोतत पेलले. इतर विभागाच्या तुलनेत मुंबईत कॉपीच्या घटनादेखील तुरळक होत्या. त्यामुळे निकाल कमी लागला असल्याचेही बोरसे म्हणाले. परीक्षाकाळात कोणत्या ना कोणत्या नैराश्येत असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे कामदेखील मुंबईतील समुपदेशकांनी चोख बजावले, असेही बोरसे म्हणाले.
मराठीत 15 हजार विद्यार्थी नापास; हिंदीत उत्तीर्ण वाढले
बारावीच्या परीक्षेत यंदा मराठी विषयात तब्बल 15 हजार 569 विद्यार्थी नापास झाले आहेत. तर इंग्रजीत तब्बल 65 हजार 852 तर सर्वात कमी हिंदी विषयात केवळ 7 हजार 153 विद्यार्थी नापास झाले आहेत. मुंबई विभागातही अशीच स्थिती असून उलट मुंबईत हिंदी या विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. बारावीच्या परीक्षेत मराठी विषयासाठी यंदा राज्यभरातून 8 लाख 45 हजार 342 विद्यार्थी बसले होते. त्यातून 8 लाख 29 हजार 773 असे एकूण 98.16 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले असून उर्वरित 15 हजार 569 विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठीच्या तुलनेत हिंदीतून नापास होण्याचे प्रमाण राज्यात कमी असून या विषयाला 3 लाख 68 हजार 335 विद्यार्थी बसले होते. त्यातून 3 लाख 61 हजार 183 म्हणजेच 98.06 टक्के विद्यार्थी पास झाले तर उर्वरित केवळ 7 हजार 153 विद्यार्थी नापास झाले आहेत. मुंबई हिंदी विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.13 टक्के असून 1 लाख 29 हजार 992 विद्यार्थ्यांपैकी केवळ 2 हजार 432 विद्यार्थी नापास झाले आहेत. तर मुंबईत मराठी विषयाची परीक्षा ही 1 लाख 2 हजार 611 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील 98.06 टक्के उत्तीर्ण झाले असून त्यात 1 हजार 989 विद्यार्थी नापास झाले असून इंग्रजी विषयाला बसलेल्या 3 लाख 28 हजार 451 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 8 हजार 989 विद्यार्थी म्हणजेच 94.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर 19 हजार 462 विद्यार्थी हे इंग्रजीत नापास झाले आहेत.
फेरपरीक्षेसाठी 10 जूनपासून अर्ज
जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया बारावीच्या फेरपरीक्षेसाठी तसेच श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना 10 जूनपासून ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थी www. mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची मुदत 17 जूनपर्यंत आहे.
नाशिक मंडळाचा 94.35 टक्के निकाल
नाशिक विभागीय मंडळाचा बारावीचा निकाल 94.35 टक्के लागला आहे. विभागात धुळे जिह्याचा निकाल सर्वाधिक 96.37, तर नंदुरबार- 95.63, जळगाव- 95.46 आणि नाशिक 92.65 टक्के असा आहे. विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिह्यांतून एकूण 1 लाख 64 हजार 962 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 1 लाख 64 हजार 29 मुला-मुलींनी परीक्षा दिली असून 1 लाख 54 हजार 764 जण उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 94.35 आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी 5.26 ने घसरली आहे. सन 2021 ला 99.61, सन 2020–88.87, तर 2019 मध्ये 84.77 असा निकाल होता.
मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नावनोंदणी आजपासून
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. 9 जून 2022 पासून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू करण्यात येत आहे. हेल्पलाइन क्रमांकसुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, 20 जूनपर्यंत अर्ज विक्री आणि प्रवेशपूर्व नोंदणी होणार आहे, तर 10 ते 20 जूनदरम्यान ऑनलाइन फॉर्म सादर करता येतील.





























































