ऑक्टोबर हिटमुळे तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता; मॉन्सूनचा परतीचा प्रवासही रखडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ऑक्टोबर हिटचा परिणाम राज्यात जाणवू लागला आहे. यंदा ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा कडाका दाहक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ऑक्टोबर हिटमुळे पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 अंशांनी जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारचे कमाल तापमानही 2 अंशाने, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उत्तरेकडे राजस्थानच्या वायव्य टोकावर पश्चिमी झंजावात व दक्षिणेत तामिळनाडूमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. याच्या परिणामामुळे येत्या 3 दिवसांत मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. बुधवारपासून ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम राज्यात पुन्हा जाणवणार आहे.

दरवर्षीपेक्षा यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान २ अशांनी वाढणार आहे, तर पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 अंशांनी जास्त असण्याची शक्यता आहे. कोकण व मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम सर्वाधिक जाणावणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यंदा मॉन्सूनने जास्तच लहरीपणा दाखवला असून आगमनावेळी तो दोन आठवडे कोकणकिनारपट्टीवर रेंगाळत होता. आता परतीच्या प्रवासावेळीही तो कोकणात रेंगाळला आहे. नैऋत्य मान्सून अद्याप वेंगुर्ल्यापर्यंत रखडला आहे. मॉन्सून देशातून पूर्णपणे परतला नसून त्याला परतीसाठी अजून काही वाट पहावी लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.