
सामना प्रतिनिधी । शिर्डी
खोदकाम करताना सोन्याची पाच किलो वजनाची नाणी सापडले असून ते कमी किमतीत विकायचे असे सांगून एकास ५० लाख रूपयांना लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरूध्द शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत इंद्रकुमार मंगतराम बक्षी रा. नवी दिल्ली यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. ५ जून ते ११ जून २०१८ या कालावधीत साईमंदिराच्या गेट नंबर दोन समोरील हॉटेल नवजीवन समोर आरोपी विनोद (पूर्ण नाव माहीत नाही) व त्याच्या तीन साथिदारांनी खोदकाम करताना आपल्याला सोन्याची पाच किलो वजनाची नाणी सापडली असून ते विकायचे असल्याचे आपल्याला सांगितले. आरोपींनी बक्षी यांनी त्यातील एक नाणे तपासणीसाठी दिले. ते नाणे खरे असल्याने बक्षी यांनी आरोपींकडून सोन्याची नाणी घेण्याची तयारी दाखविली. त्यानंतर आरोपींनी बक्षी यांना घोटी येथे ५० लाख रूपये घेऊन बोलावले. बक्षी पैसे घेऊन घोटी येथे गेले असता आरोपी विनोद व त्याच्या तीन साथिदारांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ५० लाख रूपये जबरदस्तीने हिसकावले अन फरार झाले. बक्षी यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा रजि.न. १३०/२०१८ भादवि ३९२, ४२०,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदिश मुलगीर हे करीत आहे.



























































