
कोरोना संकटात दोन वर्षांत झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी महापालिकेच्या 3 लाख 60 हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून माध्यमातून विद्यार्थ्यांची साधारण, हुशार व जास्त हुशार असे वर्गीकरण करण्यात आले आहे. साधारण गटात असलेल्या विद्यार्थ्यांमधील कमतरतेचा अभ्यास करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी भर दिला जाणार आहे.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोना आणि लॉकडाऊन या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र, ऑनलाईन शिक्षण आणि प्रत्यक्षात विद्यार्थी शिक्षण घेणे यात फरक असून प्रत्यक्ष शिक्षण घेतल्यास विद्यार्थी अनेक गोष्टी आत्मसात करू शकतात. मात्र कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू असून कोरोनाच्या काळात गेल्या अडीच वर्षांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेत विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे बक्षीस देण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांचे तीन गटांत वर्गीकरण करून एखादा विद्यार्थी कुठल्या विषयात कमी पडत असेल तर त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांकडून त्याला मार्गदर्शन केले जाणार आहे.





























































