
सामना प्रतिनिधी । शिरोळ
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे विनापरवाना बेकायदेशीर खासगी सावकारी करणार्या तीन सावकारांवर पोलिसात गुन्हे दाखल झाले. जोतिबा लक्ष्मण जाधव भरत महावीर टोण्णे दोघे रा. कुरुंदवाड शंकर आण्णू कागले रा. मजरेवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत.
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात विनापरवाना बेकायदा खासगी सावकारी जोमात सुरु असून त्यातून सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याबाबतच्या तक्रारी सहकार विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याबाबतची चौकशी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कुरुंदवाड शहरातील दहाजणांच्या निवासस्थांनावर धाडी टाकल्या व पाच तास कसून चौकशी करीत नऊ लाखांची रक्कम व आक्षेपार्ह कागदपत्रे, चेक, वाहनांचे आरसी बुक, असे सावकारीबाबत साहित्य जप्त केले होते. यानंतर शहर व परिसरात एकच खळबळ उडाली.
रात्री उशीरापर्यंत सहकार विभाग, वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत होते. याप्रकरणी तीन सावकारांवर गुन्हे दाखल झाले. जोतिबा लक्ष्मण जाधव व टोण्णे यांच्या कुरुंदवाड व शंकर कागले यांच्या जरेवाडी येथील निवासस्थांनी टाकलेल्या धाडीत अधिकार्यांच्या पथकाला बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली. दरम्यान, काल दहाजणांच्या निवासस्थांनी धाडी टाकण्यात आल्या. त्यातील तीनच सावकारावर गुन्हे दाखल झाले आहेत. आणखीन तीन जणांवर उद्यापर्यंत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बडे मासे बाहेरच
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड हे २० ते २५ गावांसाठी महत्वाचे व्यापारी व मध्यवर्ती ठिकाण असून शहरात मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी केली जाते. जवळपास शंभरावर खासगी सावकार गल्लीबोळात फोफावले आहेत. कोट्यावधीचे व्यवहार इथं होतात. रंजल्या गांजल्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. सहकार विभागाने इतिहासात पहिल्यांदाच खासगी सावकारावर छापेमारी केली. ज्यांच्या बाबत तक्रारी होत्या, त्यांच्यावरच कारवाई झाली. मात्र बडे मासे अजून बाहेरच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

































































