लाचखोर तलाठ्याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पकडल्या गेलेल्या तलाठ्याला जिल्हा न्यायाधीश एस.एस.खरात यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

किनवट तालुक्यातील ढिगळी गंगाबोडी या गावात सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर अश्रू शिवराम भालेराव (६५) यांनी दोन वेगवेगळ्या लोकांची तीन एकर जमीन खरेदी केली. याबाबत फेरफार करण्यासाठीचा अर्ज सज्जा मांडवा येथील तलाठी विष्णू प्रल्हाद राजूरवार (३८) यांच्याकडे दिला. यासंदर्भाने फेरफार करुन त्यांचे नाव सातबारावर नोंदविण्यासाठी वीस हजार रुपये द्यावे लागतील असे विष्णू राजूरवारने सांगितले. तेंव्हा अश्रू भालेराव याबाबत गप्प राहिले. १८ जून २०१२ रोजी आपल्या पत्नीच्या खात्यातून त्यांनी १५ हजार रुपये काढले आणि राजूरवार यांना दिले. कारण १५ हजारावर तडजोड झाली होती. त्यानंतर सुध्दा अश्रू भालेराव यांचा फेरफार सातबाराला लागला नाही. तेंव्हा त्यांनी ८ ऑगस्ट २०१२ रोजी तलाठी विष्णू राजूरवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी थकबाकी राहिलेले पाच हजार रुपये दिले तरच फेरफार सातबाराला लागेल असे सांगितले.

यानंतर त्याच दिवशी ८ ऑगस्ट २०१२ रोजी अश्रू भालेराव यांनी नांदेडला येवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक प्रताप शिकारे आणि त्यांच्या पथकाने ९ ऑगस्ट २०१२ रोजी किनवट येथील तलाठी विष्णू राजूरवार यांच्या खासगी कार्यालयात सापळा रचला. त्यांनी या सापळ्याची पडताळणी करताना डिजीटल रेकॉर्डरने अश्रू भालेराव आणि विष्णू राजूरवार यांचे बोलणे रेकॉर्ड केले. लाचेची उर्वरित थकबाकी पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या विष्णू राजूरवारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरित जेरबंद केले. त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याआधारे पहिले जिल्हा न्यायाधीश एस.एस.खरात यांनी तलाठी विष्णू राजूरवारला दोषी मानले. विष्णू राजूरवारला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ प्रमाणे तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच रुपये रोख दंड, दंड भरला नाही तर एक महिना कैद तसेच कलम १३ (ड) (१) यासाठी तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड, दंड भरला नाही तर एक महिना कैद अशा शिक्षा ठोठावल्या आहेत. या सर्व शिक्षा विष्णू राजूरवारला एकत्रित भोगायच्या आहेत, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.संजय लाठकर यांनी दिली. या खटल्यात तलाठी विष्णू राजूरवारची बाजू अ‍ॅड.मनिष शर्मा यांनी मांडली होती.