ताडोबाच्या अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी जिप्सीतून फिरताना वाघाला तर गीरच्या जंगलातही सिंहाला घेरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अतिउत्साही पर्यटकांवर वाघ प्रचंड भडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटमध्ये ताडोबाची पुनरावृत्ती झाली, मात्र यावेळी पर्यटकांना पाहून वाघ इतका भडकला की, तो हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याची डरकाळी ऐकून पर्यटक प्रचंड घाबरले, त्यांची अक्षरशः पाचावर धारण झाली. काही जण तर किंचाळलेच, परंतु गाडीचे इंजिन सुरू केल्यानंतर वाघ विरुद्ध दिशेला निघून गेला. हा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला असून अतिउत्साही पर्यटकांसाठी हा मोठा धडा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अवघ्या 12 सेपंदांच्या या व्हिडीओत वाघ प्रचंड आक्रमक झालेला दिसतो.
12 सेकंदांच्या व्हिडीओत काय?
जिप्सीतून व्याघ्र सफारीचा आनंद घेताना काही पर्यटक दिसतात. अचानक झाडीतून एक वाघ बाहेर येतो. त्यामुळे एक महिला कॅमेरा त्याच्याकडे वळवते. आणखी एक जण त्याचा व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून वाघ धावत जिप्सीच्या दिशेने येतो आणि जोरदार डरकाळी फोडतो. ते पाहून पर्यटक किंचाळतात. जिप्सीतील गाईड पर्यटकांना शांत करतो आणि गाडीचे इंजिन सुरू होताच वाघ विरुद्ध दिशेला निघून जातो, असे व्हिडीओत दिसते.