
>> टिळक उमाजी खाडे
सोळा वर्षांपर्यंतच्या मुलांना खासगी शिकवणी वर्गात बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य व स्तुत्य असला तरी पालकांची आपल्या पाल्यांना खासगी शिकवणी वर्गात घालण्याची मानसिकता, कोचिंग क्लासवाल्यांचे राजकारण्यांशी असलेले साटेलोटे पाहता ही बंदी यशस्वी ठरेल असे वाटत नाही. या नियमातून सुटण्यासाठी अनेक पळवाटा व चोरवाटा खासगी कोचिंग क्लासवाल्यांकडून तसेच दस्तुरखुद्द पालकांकडूनच काढल्या जातील व सुचवल्याही जातील. काही खासगी कोचिंग क्लासवाले आम्ही मुलांना मोफत व विनाशुल्क मार्गदर्शन करतो असे प्रतिज्ञापत्र पालकांकडून लिहून घेण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत. मिया-बिबी राजी तो क्या करेगा काझी? काही जण सरकारकडून व लोकप्रतिनिधींकडून विशेष परवानगी घेतील, तर काही क्लासवाले चक्क शाळेशीच संधान बांधतील. मग त्याचे काय? त्यामुळेच जे गुटखा बंदीचे व प्लॅस्टिक बंदीचे झाले तेच खासगी शिकवणी बंदीचे होईल हे मात्र नक्की.
या खासगी शिकवणी वर्गाचे कोंब सर्वात आधी 80-90 च्या दशकापासून आपल्याकडे फुटले. आता त्याचा डेरेदार वृक्ष झाला आहे. या खासगी शिकवणी वर्गाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे ‘गल्ली क्लास’ व दुसरा ‘कोचिंग क्लास.’ गल्ली क्लासमध्ये एखादी ताई वा एखादी आंटी एकाच खोलीत पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘पार्ट टाईम बिझनेस’ म्हणून शिकवत असते. यातून कोणते ज्ञान मुलांच्या डोक्यात झिरपणार? पण पालकइच्छेपुढे पाल्यांचे काय चालणार? दुसरा प्रकार एखाद्या भव्यदिव्य इमारतीत एखाद्या कॉर्पोरेट बँकेसारखा थाटलेला वातानुकूलित कोचिंग क्लास. यामध्ये प्रत्यक्ष ज्ञानार्जनापेक्षा डेस्क-बेंच, प्रिंटेड नोट्स, बर्थडे सेलिब्रेशन, फसव्या स्कॉलरशिप व क्लासच्या सहली यांचाच भपका जास्त. कोचिंग क्लास ही एक कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी एक इंडस्ट्री झाली आहे.
या कोचिंग क्लासेसचे पेव फुटण्यास व हे पीक फोफावण्यास बऱयाच अंशी पालक तर काही अंशी शाळेतील शिक्षक व सरकारची शिक्षणविषयक धोरणे जबाबदार आहेत. पूर्वी खासगी शिकवणीला जाणारा विद्यार्थी ‘ढ’ म्हणून लपूनछपून जात असे. पूर्वी खासगी शिकवणीला जाणे कमीपणाचे लक्षण मानले जात असे. आज पालकच आमचा विद्यार्थी अमुकतमुक कोचिंग क्लासला जातो असे मोठ्या अभिमानाने व तोऱयात सांगत आहेत. अगदी शिशूवर्गापासून दहावीपर्यंत आपल्या मुलांना खासगी क्लास हवाच अशीच ठाम समजूत शहरातील व आता खेड्यातील बहुतांशी पालकांची झाली आहे. खासगी क्लासशिवाय आपल्या पाल्याला तरणोपाय नाही हेच त्यांच्या मनावर बिंबवले जात आहे. काही ठिकाणी तर शाळेचे तास बुडवून मुले खासगी क्लासला जात आहेत, तर खासगी क्लासला जाणारी मुले शाळेतील शिक्षकांचा अनादर करू लागली आहेत. यातून शाळा व्यवस्थापनाने व शाळेतील शिक्षकांनी योग्य तो बोध घ्यायला हवा. आपल्या शाळेतील व वर्गातील विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसकडे फिरकणारही नाहीत असे वातावरण शाळेत तयार करायला हवे. ‘10-5-58’ या साच्यात (10 वाजता शाळेत जाणे, 5 ला शाळेतून घरी येणे व 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होणे) न अडकता भाकरीला स्मरून चाकरी करायला हवी.
शिक्षक हा ‘धंदा’ किंवा ‘साईड बिझनेस’ नसून ते पिढ्या घडवण्याचे एक पवित्र व्रत आहे हे आमच्या शिक्षक बंधू- भगिनींनी पुन्हा एकदा लक्षात घ्यावे. निवडणूक, जनगणना, सर्वेक्षण, मध्यान्ह भोजन, माहिती भरणे व पाठवणे अशा अनेक अशैक्षणिक कामांमुळे शाळेतील शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनास फार कमी वेळ मिळतो याचादेखील धोरणकर्त्यांनी पुरेशा गांभीर्याने विचार करावा. शाळा व खासगी क्लास यांच्या चक्रव्यूहात अडकून या कोवळ्या वयातील मुलांचे बालपण कुस्करून जाणार याची सर्वस्वी जबाबदारी पालक, शिक्षक व सरकारचीही आहे. बालपणीच मुलांना खेळण्यास व त्यांना छंद जोपासण्यास वेळच मिळाला नाही तर त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलणार, खुलणार तरी कसे? त्यामुळे यापुढे तरी सरकारी धोरणकर्त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता त्याला सुजाण नागरिक व संतुलित व्यक्तिमत्त्वाचा चांगला माणूस बनवण्याच्या कामी प्राधान्यक्रमाने पुढाकार घ्यावा एवढीच माफक अपेक्षा.



























































