लेख – मराठी साप्ताहिके व मासिकांची पहाट उगवेल का?

>> टिळक उमाजी खाडे

वाचनाची आवड कमी झाली आहे अशी ओरड करण्यापेक्षा दूर गेलेला मराठी वाचक पुन्हा एकदा मराठी साप्ताहिके व मासिकांकडे कसा वळेल यासाठी पद्धतशीर व जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. जेथे प्रश्न तेथेच उत्तर, या न्यायाने ज्या मोबाईलमुळे वाचक साप्ताहिक व मासिकांपासून दुरावले त्याच मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल रूपात ही मासिके आणून वाचकांना पुन्हा एकदा ‘कनेक्ट’ करता येईल.

पारतंत्र्याच्या काळात 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ नावाचे मराठीतील पहिले साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले आणि त्यानंतर त्यांनीच 1840 साली ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिक सुरू केले. साप्ताहिक ‘साधना’सारखे काही मोजके सन्माननीय अपवाद वगळल्यास मराठी मासिके व साप्ताहिके 25-30 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत हा इतिहास आहे. हा इतिहास कटू असला तरी ते वास्तव आहे. आपल्या डोळय़ांसमोर अनेक नामांकित व लोकप्रिय मराठी साप्ताहिके व मासिके धडाधड बंद पडत आहेत. अनेक आव्हाने झेलत, संकटांवर मात करत मराठीत आजही अनेक दैनिक वृत्तपत्रे व दिवाळी अंक चालू आहेत. मग साप्ताहिके व मासिकेच का बंद पडत आहेत? जी साप्ताहिके व मासिके सुरू आहेत ती बहुतांशी कोणत्या तरी तालुका, जिल्हा, संस्था, संघटना वा एखाद्या गटापुरती सीमित आहेत. मोबाईल बनवणाऱया नोकिया कंपनीची जी गत झाली तीच मराठीतील साप्ताहिके व मासिकांची तर झाली नाही ना? अँड्रॉईड मोबाईल फोनच्या बाबतीत सॅमसंग कंपनीने बदल स्वीकारला म्हणून जागतिकीकरणाच्या लाटेतही सॅमसंग कंपनीचा मोबाईल टिकून राहिला. तसा बदल नोकिया कंपनीने न स्वीकारल्यामुळे ती कंपनी मोबाईलच्या बाजारातून दूर फेकली गेली. मराठी साप्ताहिकांच्या बाबतीत जे ‘साधना’ला जमले ते इतरांना का जमू नये? दूरचित्रवाणी हे माध्यम सुरू होऊनही चित्रपट निर्मिती का बंद झाली नाही? याचाही विचार मराठी साप्ताहिके व मासिकांनी करावा. ‘कालाय तस्मै नमः’ हा मंत्र मराठीतील साप्ताहिके व मासिकांनी स्वीकारायलाच हवा.

गेल्या दोन-तीन दशकांत तर जग झपाटय़ाने बदलले आहे. इंटरनेटद्वारे जवळ आलेले जग, 24 तास चालू असलेल्या वृत्तवाहिन्या व मनोरंजनाचा रतीब घालणाऱया दूरचित्रवाणीवरील मनोरंजन वाहिन्या, व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांसारखी सेवातत्पर समाज माध्यमे, अमर्याद वेळ बोलण्यासाठी उपलब्ध असलेला मोबाईल फोन, गुगलसारख्या सर्च इंजिनवर सुरू असलेला माहितीचा धबधबा यांचा बोलबोला सध्या सुरू आहे. ही आधुनिक साधने सामान्य माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. या सर्व गदारोळात टिकून राहतील अशी साप्ताहिके व मासिके काढण्यासाठी मराठीतील लेखक, संपादक, विचारवंत, कलावंत, प्रकाशक, मराठी साहित्य व संस्कृती महामंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, शासनाचा मराठी विभाग यांनी पुढाकार घ्यावा. अलीकडे वाचनाची आवड कमी झाली आहे अशी ओरड करण्यापेक्षा दूर गेलेला मराठी वाचक पुन्हा एकदा मराठी साप्ताहिके व मासिकांकडे कसा वळेल यासाठी पद्धतशीर व जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. वाचकांच्या वयोगटानुसार व अभिरुचीनुसार सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांबरोबरच क्रीडा, मनोरंजन, आरोग्य, विज्ञान, पर्यावरण, कृषी, अर्थकारण, महिला, बालकुमार या विषयांवरील साप्ताहिके व मासिके मराठीत प्रकाशित व्हायला हवीत. तोचतोपणा टाळून विषयाची सखोल मांडणी करणारे खुसखुशीत लेखन, आशयघन विश्लेषण करणारे नावीन्यपूर्ण लेख लिहिण्यास जुन्या तसेच नवोदित लेखकांना प्रवृत्त करावे. साप्ताहिके व मासिकांपुढे महागलेला कागद व छपाईचे वाढते दर, कार्यालयीन खर्च, जाहिरातींची वानवा, घटत चाललेले वर्गणीदार ही आव्हाने असली तरी डिजिटल, ऑनलाइन, इलेक्ट्रॉनिक या आधुनिक माध्यमांच्या रूपात नवीन संधीदेखील खुणावत आहेत. फक्त मराठी मासिकांच्या संचालकांनी व संपादकांनी या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. मराठी मासिकांतून दर्जेदार व सकस साहित्य दिले तर मराठी वाचक व जाहिरातदार पुन्हा एकदा मराठी मासिकांकडे आकृष्ट व्हायला फारसा वेळ लागणार नाही. वाचकांची अभिरुची बदलली असेल तर विषयांचे वैविध्य राखून त्यावर मात करता येईल. वेळखाऊ कसोटी क्रिकेटला कंटाळलेल्या क्रिकेट रसिकांना क्रिकेट संघटकांनी क्रिकेटला ट्वेंटी-ट्वेंटीच्या रूपात आणून नवसंजीवनी दिली. असेच काहीसे प्रयोग व बदल मराठी मासिकांमध्ये व साप्ताहिकांमध्ये करता येतील का? याचादेखील विचार व्हायला हवा.

1947 पासून तामीळ भाषेत व 1952 पासून मराठीत प्रकाशित होणारे व आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असणारे ‘चांदोबा’ हे मासिक गेल्या वर्षी बंद पडले. वाढता खर्च व नवीन बदल अंगीकारण्यात आलेले अपयश ही त्यामागची कारणे आहेत. जेथे प्रश्न तेथेच उत्तर, या न्यायाने ज्या मोबाईलमुळे वाचक साप्ताहिक व मासिकांपासून दुरावले त्याच मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल रूपात ही मासिके आणून वाचकांना पुन्हा एकदा ‘कनेक्ट’ करता येईल. पारंपरिक रिवाजानुसार केवळ तुटपुंज्या ‘मानधना’वर लेखकांची बोळवण करण्यापेक्षा त्यांच्या लेखनाचा योग्य तो मोबदला दिल्यास त्यांना कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल व अधिक तळमळीने दर्जेदार लेखन करण्यास ते प्रवृत्त होतील. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बंद पडलेल्या व नवीन साप्ताहिके व मासिके यांची नवी पहाट पुन्हा एकदा उगवेल का?