टोकियो ऑलिम्पिकमधील सहभागासाठी सायना, श्रीकांत डेन्मार्क ओपनमध्ये खेळणार

कोरोनामुळे यंदाचे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले. या जागतिक स्तरावरील मानाच्या स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी हिंदुस्थानातील बॅडमिंटनपटू प्रयत्न करीत आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट जवळपास बुक आहे, पण सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंना मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळावा यासाठी रँकिंग पॉइंट वाढवण्याची गरज आहे. याच कारणामुळे सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत 13 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया डेन्मार्क ओपन या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या दोघांसह पारुपल्ली कश्यप, अजय जयराम, शुभांकर डे व लक्ष्य सेन या खेळाडूंचा सहभागही निश्चित आहे. पी. व्ही. सिंधू, सिक्की रेड्डी, अश्विनी पोनप्पा, मनू अत्री, सुमित रेड्डी यांनी डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली आहे अशी माहिती एका दैनिकामधून प्रसिद्ध करण्यात आलीय.

सायना, श्रीकांत, लक्ष्यला स्पॉन्सरशिप

साईकडून सहा बॅडमिंटनपटूंना स्पॉन्सरशिप दिली जाते. यामध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, सिक्की रेड्डी व अश्विनी पोनप्पा या खेळाडूंचा समावेश आहे. आता यामधील तीनच खेळाडू डेन्मार्क ओपन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत व लक्ष्य सेन ही या तीन खेळाडूंची नावे आहेत.

स्पॉन्सर नसलेल्यांनाही सहकार्य करतो

कोरोनाच्या काळात स्वःताच्या रिस्कवर स्पर्धांना जायची तयारी ठेवा, याबाबत स्वतः लेखी स्वरूपात ते लिहून द्या अशा प्रकारची अट बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून ठेवण्यात आली. यावर या संघटनेतील अधिकारी म्हणाले, आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही, कोरोनाच्या काळात साईकडून आलेल्या नियमांचे पालन करतो आहोत. तसेच ज्या खेळाडूंना स्पॉन्सरशिप देण्यात येत नाही अशा खेळाडूंनाही सहकार्य केले जाते. त्यांचा व्हिसा, स्वस्तात राहण्याची व्यवस्था आदी सुविधा दिल्या जातात.

तीन आशियाई स्पर्धा खेळायच्या आहेत – सिंधू

थॉमस ऍण्ड उबेर कप हा सांघिक इव्हेण्ट होता. या स्पर्धेत मला हिंदुस्थानला पदक जिंकून द्यायचे होते, पण आता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच डेन्मार्क ओपनमध्ये सहभागी झाले तर मायदेशात येऊन 14 दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यामुळे डेन्मार्कला जाण्यात काही अर्थ नाही. तसेच आगामी काळात मला तीन आशियाई स्पर्धांमध्ये खेळायचे आहे असे स्पष्टीकरण पी. व्ही. सिंधू हिने यावेळी दिले. यावर सिक्की रेड्डी म्हणाली, डेन्मार्कमध्ये किमान दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असत्या तर तिथे जाण्यास कोणतीही अडचण नव्हती, पण फक्त एका स्पर्धेसाठी डेन्मार्कला जाण्याची रिस्क मी घेणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या