मुरूड समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला; सुटीमुळे पर्यटकांमध्ये वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीनंतर भाऊबिजेच्या दिवशी सकाळपासूनच मुरूड समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले होते. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्टयांमुळे अनेकांची पावले दापोली तालूक्यातील मुरूड समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी वळल्याने दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच पर्यटकांच्या गर्दीने मुरूड समुद्र किनारा फुलल्याचे दिसत होते.

दापोली तालूक्यातील मुरूड समुद्र किनारा पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर नेहमी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, कोरोना महामारीनुळे दोन वर्षे पर्यटन थांबल्याने यावर आधारीत उद्योगधंदे संकटात सापडले होते. आता कोरोना नियंत्रणात आल्याने पुन्हा पर्यटनाला परवानगी मिळाल्याने पर्यटकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पर्यटनाला परवानगी मिळाल्याने अनेक पर्यटक मुरूड समुद्र किनारी आले आहेत. त्यामुळे मुरूडमधील सर्वच हॉटेल, निवासाच्या सोयीची ठिकाणे हाऊस फुल्ल झाली आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक तसेच पर्यटनावर आधारीत अन्य व्यवसायिक दिवाळीच्या शुभ मुहर्तावर व्यवसाय होत असल्याने चांगलेच सुखावले आहेत. वाढलेल्या पर्यटकांमुळे पोलीसांवर गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा ताण होता.