आता वाहतूक कर्मचाऱ्यांनाही 3 शिफ्टमध्ये ड्युटी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार आता वर्दळीच्या काही ठिकाणी ट्राफिक नियमनासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये ड्युटीला हजर व्हावे लागणार आहे. संबंधित वाहतूक कर्मचाऱ्यांना रात्रपाळी (रात्री दोन वाजेपर्यंत) करावी लागणार आहे. त्यासंदर्भात वाहतूक विभागाने नियोजन केले असून वाहतूक नियमनाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

वाढती वाहनसंख्या, अरूंद रस्ते, विकासकामांसाठी खोदकाम आणि कुचकामी प्रवाशी वाहतूक यंत्रणेमुळे वाहतूककोंडीत भर पडली आहे. त्यातच गर्दीच्या ठिकाणी कायमस्वरूपी होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आता कोरेगाव पार्क, जंगली महाराज, रस्ता, बाणेर, चतुःशृंगी, स्वारगेट, मार्केटयार्ड, हडपसर, कोथरूड परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांना रात्रपाळी करावी लागणार आहे. एरवी बहुतांश चौकात रात्री दहानंतर वाहतूक वर्दळ कमी झाल्यानंतर मॅन्युअल सिग्नल यंत्रणा कार्यन्वित होते. मात्र, कोरेगाव पार्क, चतुःशृंगी, स्वारगेट, जंगली महाराज रस्ता परिसरासह काही वर्दळीच्या ठिकाणांवर रात्री एकवाजेपर्यंत सिग्नल सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांना तीनशिफ्टमध्ये काम करून वाहतूक नियमनाला गती द्यावी लागणार आहे.

शहरात शाळा, महाविद्यालयासह विद्यार्थ्यांसह नोकरदार तरूण-तरूणींची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून दरशनिवारी आणि रविवारी पाट्र्याचे नियोजन केले होते. विशेषतः मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर, मध्यवर्ती ठिकाणांवर रात्री दोन वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यापार्श्वभूमीवर संबंधित वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहून कारवाईऐवजी नियमन करावे लागणार आहे. हद्दीतील वाहतूककोंडी सोडवून वाहनचालकांना दिलासा देण्याचे काम कर्मचाऱ्यांनी करावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ठिकठिकाणी होणारी वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

वाहनचालकांचे सहकार्य अपेक्षित

वाहतूक कर्मचारी नियमन करीत असताना काही बेशिस्तांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग, दुचाकीवर ट्रीपलसीट प्रवास, राँगसाईट ड्रायव्हिंग केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास ट्राफिकपासून सुटका होणार आहे.

”शहरात रात्रीच्यावेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तीन शिफ्टमध्ये काम करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाहतूक विभागाकडून नियोजन केले आले असून रात्रपाळी वाहतूक नियमन सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.”

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर