
सामना ऑनलाईन । मुंबई
वरळी, परळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून होत असलेली प्रचंड वाहतूककोंडीची समस्या आता लवकरच कमी होणार आहे. लोअर परळचा रेल्वे पूल बंद झाल्यामुळे सगळी वाहतूक एल्फिन्स्टन पुलावरून वळवण्यात आल्यामुळे वरळी, परळ परिसरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. यावर उपाय म्हणून या परिसरातील चार मार्गांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे हटवण्याची कार्यवाही पालिकेच्या जी-दक्षिण विभागाने केली आहे. त्यामुळे सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, बोरीचा मार्ग व ना. म. जोशी मार्ग वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत.
‘मेट्रो’सह सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वरळी, परळ आदी परिसरातील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला होता. त्यातच लोअर परळ रेल्वे स्थानकावरील डिलाईल रोडचा पूल पुनर्बांधकामासाठी बंद केल्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. गाडय़ा आणि पादचारी यांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. पुलाचे बांधकाम होण्यास काही वर्षे लागणार असल्यामुळे या वाहतूककोंडीवर उपाय शोधणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने या विभागातील वाहतुकीचा आढावा घेतला असता महत्त्वाच्या चार मार्गांमध्येच असलेल्या झाडांचाही प्रतिकूल परिणाम वाहतुकीवर होत असल्याचे निदर्शनास आले होते. हे लक्षात घेऊन वृक्ष प्राधिकरण समितीच्या पूर्वपरवानगीने वाहतुकीला अडथळा ठरणारी सात झाडे रस्त्यावरून हटविण्यात आली आहेत.
येथील झाडे हटवली
- परिमंडळ–2 चे उपायुक्त नरेंद्र रामकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘जी-दक्षिण’ विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या कार्यवाहीदरम्यान दीपक टॉकीजजवळ असणारी ना. म. जोशी मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी चार झाडे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे ना. म. जोशी मार्गासह सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गोखले मार्ग इत्यादी मार्गांवरील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
- तसेच अपोलो मिल कंपाऊंडजवळ असणाऱ्या 60 फुटी बोरीचा मार्गावर रस्त्यावरच असणाऱ्या तीन झाडांमुळे 60 फुटी रस्त्यापैकी केवळ 20 फुटांचाच रस्ता प्रत्यक्ष वाहतुकीला उपलब्ध होत होता, मात्र आता ही झाडे हटविल्यामुळे हा 60 फुटी रस्ता प्रत्यक्षपणे वापरता येणार आहे.
तीन झाडांचे पुनर्रोपण
या सात झाडांपैकी सक्षम असणाऱ्या तीन झाडांचे ‘क्रेन’च्या सहाय्याने वरळी स्मशानभूमी परिसरात पुनर्रोपणदेखील करण्यात आले आहे तर उर्वरित झाडे ही बाधित होती. ही सात झाडे हटविल्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘जी-दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली.

































































