प्रशिक्षणार्थी अग्निवीर तरुणीची आत्महत्या

प्रशिक्षणार्थी अग्निवीर तरुणीने नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अपर्णा नायर असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

अपर्णा मूळची केरळची रहिवासी होती. तिची ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली होती. 15 दिवसांपूर्वी ती प्रशिक्षणासाठी मालाडच्या ‘आयएनएस हमला’ येथे आली होती. तिची लॉजिस्टिक विभागात नियुक्ती केली होती. सोमवारी ती हॉस्टेलवर गेली. तिने रूममधील चादरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच तिला नौदलाच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच मालवणी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी अपर्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तिच्या अपघाती मृत्यूची माहिती कुटुंबीयांना कळवण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आली नाही. अपर्णाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास मालवणी पोलीस करत आहेत.