ट्रान्स हार्बर लिंकमुळे जागांच्या किमती वाढणार, बाजारात जोरदार चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षअखेरीस मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प पूर्ण होणार असून या प्रकल्पामुळे पनवेल व लगतच्या परिसरातील जागांच्या किमती गगनाला भिडतील, अशी बाजारात जोरदार चर्चा आहे. ट्रान्स हार्बर लिंक हा 21 किलोमीटरचा देशातील सर्वात मोठा समुद्र सेतू असून दररोज सुमारे 70 हजार वाहने या पुलावरून जाणार आहेत. मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील चिर्ले ही दोन ठिकाणे या पुलामुळे जोडली जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर हा मुंबईतील पूर्व मुक्त मार्ग आणि एलिव्हेटेड मार्गाच्या माध्यमातून मुंबई-पुणे एक्प्रेसवेलासुद्धा जोडला जाणार आहे.

नाईट फ्रँकचे कार्यकारी संचालक गुलाम झिया म्हणाले, ट्रान्स हार्बर लिंकमुळे गृह खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना पनवेल ही चांगली गुंतवणूक संधी आहे. या पुलासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळेही येथील जागांच्या किमती वाढू शकतात. प्रॉपर्टी पिस्टलचे संस्थापक आशीष अगरवाल यांच्या मते नियोजित प्रकल्पामुळे उरण आणि जेएनपीटीशी जोडणी हा महत्त्वपूर्ण दुवा निर्माण झाला आहे. विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्ग यामुळे पनवेल शहराला निश्चितच चालना मिळणार आहे.