
मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेरच्या अमराठी चालकांवर लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे. यासंदर्भात उद्या परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. सुधारित मोटर वाहन नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत त्यात कार्यपद्धती ठरवली जाणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अमराठी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. त्यांना मराठी शिकण्यासाठी परिवहन विभागाने विशेष मोहीमही राबवली होती. त्यानंतरही लाखो अमराठी चालक असे आहेत ज्यांना व्यावहारिक मराठीही बोलता येत नाही. त्यामुळे सुधारित नियमांनुसार त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे, ती कोणत्या पद्धतीने करावी याचा सविस्तर आराखडा उद्याच्या बैठकीत ठरवला जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले.
राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सींचे एकूण 9 लाख 78 हजार 541 वैध परवाने आहेत. त्यात रिक्षाचे 9 लाख 16 हजार 884 तर टॅक्सींच्या 61 हजार 657 टॅक्सी परवान्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच सुमारे 4 लाख 62 हजार 387 रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत. या प्रवासी वाहनचालकांचा रोज लाखो प्रवाशांशी संवाद होतो. त्यामुळे त्यांना किमान व्यावहारिक मराठी तरी बोलता आली पाहिजे, असे सरनाईक यांनी सांगितले.




























































