
त्रिपुरा, मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकांसाठीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं आज या तीन राज्यातील तारखा जाहीर केल्या आहेत. त्रिपुरात 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँड 27 तारखेला मतदान होणार आहे. तिन्ही राज्यांचे 2 मार्चला निकाल जाहीर होतील असे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले.
या वर्षी ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये प्रथमच विधानसभा निवडणुका होत आहेत. 2018 मध्ये भाजपने प्रथमच जिंकलेल्या त्रिपुरावर विशेष लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे.
प्रत्येकी 60 सदस्य संख्या असलेल्या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपतो आहे – नागालँड 12 मार्च, मेघालय 15 मार्च आणि त्रिपुरा 22 मार्चला.
तीन राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सुरक्षा दलांच्या हालचाली लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
त्रिपुरामध्ये भाजपचं सरकार आहे, तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेत आहे.
























































