
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा परिणाम आता शालेय विद्यार्थ्यांवरही होण्याची शक्यता आहे. संपामुळे अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी येणाऱ्या बस डिझेल मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे.
ट्रक चालक मालक संपात सहभागी असल्याने पेट्रोलचा पुरवठा होणार नसल्याच्या भितीने सोमवारी सायंकाळपासून पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे आज बहुतांश पंपावर पेट्रोल, डिझेल संपल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. डिझेल मिळत नसल्याने आता शाळेच्या बसेसवरही परिणाम होताना दिसत आहे.
याबाबत शाळाबस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. डिझेल वाचले होते त्यात शाळा बसेस त्या त्या ठिकाणी गेल्या मात्र आठ दिवस शाळा बंद असल्याने डिझेल वगैरे काही भरले नव्हते. आज सकाळी गाड्या थोड्या अंतरावर गेल्य़ा पण आता डिझेल नसल्याने शाळेच्या बस बंद ठेवाव्या लागतील. विरार, वसईच्या शाळा सुरु झाल्या आहेत. तिथे डिझेल आहे. दुपारनंतर डिझेल मिळाले नाही तर शाळा बसेस बंद होतील. यासंदर्भातील सूचना शाळा आणि पालकांनाही व्हॉट्सअॅप मेसेज करुन पाठवू अशी माहिती अनिल गर्ग यांनी दिली.


























































