अल्पवयीन गुन्हेगाराचा खून, समर्थकांनी लावले गावभर श्रद्धांजलीचे पोस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हडपसर

हडपसर भागातील मांजरी गावात एका अल्पवयीन गुन्हेगाराचा तीन तरुणांनी खून केला आहे. या गुन्हेगाराच्या दहशतीमुळे कंटाळल्याने या तरुणांनी हे पाऊल उचलले आहे. तुषार मोहन भापकर असं या अल्पवयीन गुन्हेगाराचे नाव असून त्याला ठार मारणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तुषार हा हडपसर, फुरसुंगी, मांजरी, गंगानगर भागात दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगचा सदस्य होता. त्याचा खून झाल्यानंतर तुषारचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर शोकाकूल-सरकार 302 असं लिहण्यात आलं असून असा अंदाज आहे की ही कोयता गँगने स्वत:ला सरकार 302 हे नाव दिलं आहे.

tushar-bhapkar-hoarding

तुषार हा गावामध्ये कोयता हातात घेऊन फिरायचा. महिलांची छेड काढणे, दहशत माजवणे, शिवीगाळ करणे अशा उपद्व्यापामुळे मांजराई नगरमधील नागरीक वैतागले होते. तुषारला त्याच्या घरच्यांनी, पोलिसांनीही समज दिली होती मात्र तरीही तुषारची गुंडगिरी सुरूच होती. या उपद्रवाचा सर्वाधिक त्रास शिनगारे कुटुंबियांना होत होता. या कुटुंबाने घरबांधणीसाठी विटा आणल्या होत्या. या विटा तुषारने तोडून टाकल्याने सनी दिनकर शिनगारे (वय २९), विनोद दिनकर शिनगारे (वय २७), दादा उर्फ महेश दिनकर शिनगारे (वय २६) सर्व रा. मांजराई नगर, मांजरी बुद्रुक यांच्या संयमाचा अंत झाला आणि त्यांनी तुषारला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

सनी शिनगारे व त्याच्या भावांनी तुषारला समजावून पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथेही तुषारने त्यांच्यासोबत अरेरावी करायला सुरूवात केली. यामुळे भडकलेल्या शिनगारे बंधूंनी तुषारला मारहाण केली आणि शस्त्राने भोसकून त्याचा खून केला.

पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुनील देशमुख, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे,पोलीस कर्मचारी अनिल कुसाळकर, अमित कांबळे, शाहिद शेख, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद टिळेकर यांनी आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग करीत आहेत.