पुण्यात सराईताकडून दोन दुचाकी, चार मोबाईल जप्त; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहर परिसरात मोबाईल, वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईताला बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. राकेश जॉन सकट (22 ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सकट हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान संशयीत वाहनचोर सकट हा मालधक्का परिसरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत त्याने शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले. त्याने शहरातील विविध भागातून चोरलेले चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र गावडे, सहाय्यक फौजदार मोहन काळे, अंमलदार अमोल सरडे, ज्ञाना बडे, किरण तळेकर, मनोज भोकरे, संजय वनवे, शिवाजी सरक यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.