
सामना प्रतिनिधी, कल्याण
बेकायदा बांधकाम करणाऱ्या मनसेच्या दोन नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. गटनेता प्रकाश भोईर आणि त्यांची पत्नी नगरसेविका सरोज भोईर यांचे डोंबिवलीतील राहते घर बेकायदा असल्याचा ठपका प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी ठेवून तसा अहवाल आयुक्तांना दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या जागेवर घर बांधले आहे ती जागा महसूलची असल्याने ही जागा तातडीने खाली करण्याचे आदेशही उपविभागीय अधिकाऱयांनी दिले आहेत.
प्रकाश भोईर हे मनसेचे नगरसेवक असून पालिकेतील मनसेचे गटनेताही आहेत. त्यांची पत्नीही नगरसेविका आहे. मात्र प्रकाश भोईर हे डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा परिसरातील उमेशनगर येथील ताराबाई निवास या बेकायदा घरात राहात असल्याची तक्रार शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच नगरविकास खात्याकडे केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी एस. एम. पुर्तकोटी यांनी प्रकाश भोईर यांना नोटीस पाठवून ही जागा महसूल विभागाची असल्याने तातडीने जागा खाली करण्याची नोटीस धाडली होती. शिवाय प्रभागक्षेत्र अधिकारी लहू वाघमारे यांनीही बेकायदा इमारत असल्याचा अहवाल आयुक्तांना दिला होता.
करआकारणीही नाही
जी प्लस वन असलेल्या या इमारतीला करआकारणी नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. जातपडताळणी मुद्यावरून दोघा शिवसेना नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करताना आयुक्तांनी जी तत्परता दाखवली तीच तत्परता बेकायदा बांधकाम करणाऱया प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांच्याबाबत दाखवावी, अशी मागणीही वामन म्हात्रे यांनी केली आहे.



























































