जाब विचारल्याच्या रागातून दोघांवर वार, बुधवार पेठेतील क्रांती चौकात राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीचा कट मारल्याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे त्रिकुटाने दोघांवर कोयत्याने वार करून परिसरात दहशत माजविली. ही घटना 14 नोव्हेंबरला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल मोतीपिवळे पाटील (वय 21 रा. नऱ्हेगाव ) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि त्याचा मित्र 14 नोव्हेंबरला बुधवार पेठेतील क्रांतीचौकात गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांनी त्यांना कट मारला.

त्याचा जाब विचारल्याने हल्लेखोरांनी विशाल आणि त्यांच्या मित्रावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.