
सोनई येथे गवंडीकाम करून घराकडे परतत असलेल्या राहुरी तालुक्यातील पाच मजुरांच्या वाहनाला भरधाव कारने धडक दिल्याची घटना उंबरे ब्राह्मणी शिवारात शुक्रवारी रात्री घडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून, तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
संजय उर्फ सांडू अर्जुन हिवराळे (वय 32) व कैलास छबुराव पंडित (वय 45, दोघे रा. माळवाडी, उंबरे) अशी मृतांची नावे आहेत, तर सुरेश झुगाजी ससाणे, सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड, बादशहा शेख (तिघे रा. माळवाडी, उंबरे) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
उंबरे (माळवाडी) येथील रहिवाशी असलेले हे मजूर उंबरे दिशेला, तर कारचालक सोनई दिशेला भरधाव जात होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने 5 मजुरांना धडक दिली. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेला.



























































