कायदा आणि सुव्यवस्थेची अब्रू गेली, छेडछाडीला कंटाळून 2 विद्यार्थिनींची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली आहे.  रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून बीड आणि पंढरपूरमध्ये शाळकरी मुलींनी आत्महत्या केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची पार अब्रू गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

बीडच्या वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील नववीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. या विद्यार्थिनीला अमर तिडके आणि हनुमंत सावंत हे सतत त्रास द्यायचे आणि येताजाता छेड काढायचेय त्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. वडवणी पोलिसांत गुन्हा दाखल व्हायच्या आधीच हे दोघेजण फरार झाले आहेत.

पंढरपूर तालुक्यातल्या वाखरी येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सडकछाप गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही मुलगी वाखरी येथील आश्रमशाळेत शिकत होती. दोन दिवसांपूर्वी या मुलीला शाळेतल्याच लहान मुलाकडून चिठ्ठी देण्यात आली होती. या विद्यार्थिनीऐवजी ही चिठ्ठी शिक्षकांच्या हाती लागली होती. या शिक्षकाने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला होता. काहीही चूक नसताना झालेल्या बदनामीमुळे ही मुलगी घाबरली होती आणि मानसिकरित्या खचली होती. यामुळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.