कॅसल मिल, भास्कर कॉलनीत दोन नवे उड्डाणपूल, ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

शहरातील कॅसल मिल व भास्कर कॉलनी या भागातील वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागायचा. मात्र येथे दोन नवीन उड्डाणपूल बांधण्यात आल्याने ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून हे पूल उभारले असून साऊंड बॅरियर्स लावल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रासदेखील होणार नाही.

कॅसर मिल व भास्कर कॉलनी येथे दोन नवीन पूल उभारावेत यासाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. कॅसर मिल येथील स्व. सौ. मीनाताई ठाकरे उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका आहेत. गोकुळनगर ते एलबीएस मार्गापर्यंतची मार्गिका 8.5 मीटर रुंद आहे. तर दुसरी मार्गिका जेल तलावाकडे जाणारी असून ती 7 मीटर रुंद आहे.

भास्कर कॉलनीतील उड्डणपूलही अतिशय उपयुक्त असून तो कावेरी हॉस्पिटल ते नौपाडय़ातील महात्मा गांधी मार्गापर्यंत जातो. या पुलाची रुंदी 8.5 मीटर असून लांबी 647 मीटर एवढी आहे. अल्मेडा चौकातील पूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून यामुळे प्रवासी व वाहनचालकांची मोठी सोय झाली आहे. भास्कर कॉलनी व कॅसल मिल येथील दोन्ही उड्डाणपुलांचे लोकार्पण शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. ठाणे शहरात पुलांचे मोठे जाळे निर्माण होत असून वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.

मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल
शिवसेनेचे खासदार राजन विचारे हे 2011 पासून ठाण्यातील उड्डाणपुलांसाठी पाठपुरावा करीत होते. आमदार असतानाही त्यांनी विधानसभेत वाहतूककोंडीचा प्रश्न मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मंजुरी दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून हे पूल उभारले असून विचारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.