धावत्या लोकलमधून दोन विद्यार्थी पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या माटुंगा-शीवदरम्यान लोकलमधून पडून दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज घडली. फुलचंद यादव आणि अभिषेक शर्मा अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांवर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमके ते कसे पडले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

अभिषेक आणि फुलचंद हे दोघेही धारावी परिसरात राहतात. ते करी रोड येथे महाविद्यालयात शिकतात. नेहमीप्रमाणे ते दोघे आज सीएसएमटी लोकलने करी रोडला जात होते. सकाळी 9. 30 च्या सुमारास माटुंगा आणि शीवदरम्यान पोल क्रमांक 12/10 येथे ते जखमी अवस्थेत पडून होते. याची माहिती स्टेशन मास्तरांना मिळाली. त्यांनी दादर रेल्वे पोलिसांना माहिती कळवली. काही वेळात दादर रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. त्या दोघांना जखमी अवस्थेत उपचाराकरिता लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले.

त्या दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिसांना आयकार्ड मिळून आले. त्यावरून पोलिसांनी अभिषेक आणि फुलचंदच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. गर्दीच्या वेळेस विद्यार्थ्यांनी दरवाजावर लटकून प्रवास करू नये असे दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी परीक्षेला जात असताना लोकलमधून पडून विद्यार्थिनी जखमी झाली होती. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. गर्दीमुळे प्रवासी जीव धोक्यात घालून दरवाजावर लटकत प्रवास करतात. गेल्या वर्षी मध्य रेल्वेत लोकल अपघातांत 1 हजार 920 तर पश्चिम रेल्वेत 1 हजार 429 प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे.